नोकरदार महिलांनी कुटुंबामध्ये सपोर्ट सिस्टिम तयार करावी

Share this News:

पुणे, दि. 12 मार्च 2020 : नोकरदार महिला एकाच वेळी घराबाहेर आणि घरातील दोन्ही जबाबदार आघाड्यांवर कामे करीत असतात. यामध्ये समतोल साधण्यासाठी कुटुंबियांचे पाठबळ आवश्यक असल्याने नोकरदार महिलांनी कुटुंबामध्ये स्वतःसाठी सपोर्ट सिस्टिम तयार करावी, असे आवाहन महावितरणच्या कंपनी सचिव सौ. अंजली गुडेकर यांनी केले.

महावितरणच्या वतीने सोमवारी (दि. 9) रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात सौ. गुडेकर प्रमुख्य वक्त्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) कमांडर श्री. शिवाजी इंदलकर, अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पाटील, श्री. पंकज तगलपल्लेवार, श्री. प्रकाश राऊत, सहाय्यक महाव्यवस्थापक (मासं) सौ. ज्ञानदा निलेकर आदींची उपस्थिती होती.

कंपनी सचिव सौ. गुडेकर म्हणाल्या, की तांत्रिक कामांच्या स्वरुपाची कंपनी असलेल्या महावितरणमध्ये महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. विद्युत सहाय्यकांपासून ते मोठमोठ्या पदांवर महिला अतिशय सक्षमपणे काम करीत आहेत. विविध जबाबदाऱ्यांमुळे कार्यालयीन वेळेपेक्षा उशिर होतो. अशावेळी घरच्या जबाबदाऱ्या दुर्लक्षित होऊ शकतात. त्यामुळे मानसिक त्रास होतो. तणाव वाढतो. त्याचा परिणाम आरोग्यावरही होतो. अशा परिस्थितीत कुटुंबातील व्यक्तींना नोकरीतील जबाबदाऱ्या, कामाचे स्वरुप आदींची माहिती समजून सांगावी. घरातील जबाबदाऱ्यांचे विभाजन करावे. त्यायोगे कुटुंबात एक सपोर्ट सिस्टिम तयार करावी. तसेच कामाच्या रगाड्यात स्वतःच्या आरोग्याबाबत नेहमी निष्काळजीपणा केला जातो. त्यामुळे महिलांनी आरोग्य सांभाळणे अतिशय गरजेचे आहे. यासोबतच स्वतःच्या आनंदासाठी छंद जोपासले पाहिजेत, असे सौ. अंजली गुडेकर यांनी सांगितले.

मुख्य महाव्यवस्थापक कमांडर शिवाजी इंदलकर म्हणाले, ‘महिला खऱ्या अर्थाने कुटुंबाचा कणा आहे. नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये समतोल ठेऊन काम करण्याचे कसब महिलांमध्ये अधिक आहे. नोकरीमध्ये विविध जबाबदाऱ्या पेलताना एक आई म्हणून नवी पिढी घडविण्याचे सामर्थ्य केवळ महिलांमध्येच आहे.’ यावेळी मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार म्हणाले, ‘24 तास सुरळीत वीजपुरवठ्याची सेवा देणाऱ्या कंपनीमध्ये काम करताना महिलांसाठी जबाबदाऱ्यांचे वेगळे आव्हान आहे. मात्र सर्व महिला अधिकारी व कर्मचारी अतिशय सक्षमपणे काम करीत आहेत.’

कार्यक्रमात ऍड. मृदुला चितळे, ऍड. मनिषा बेळगावकर यांनी महिलांचे अधिकार व हक्क यावर कायदेशीर माहिती दिली. सुत्रसंचालन वरिष्ठ व्यवस्थापक (मासं) सौ. अपर्णा मानकीकर यांनी केले व आभार मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर व सहकाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी महिला अधिकारी, अभियंता व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.