बालकामगार मुक्तीच्या अभियानास समाजातील प्रत्येक घटकाने मदत करणे आवश्यक – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

Share this News:

पुणे दि. 7 :- बालकामगार मुक्तीच्या अभियानास समाजातील प्रत्येक घटकाने मदत केली तर बालकामगार प्रथा समूळ नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. आजची ही लहान मुले उद्याच्या भारताचे भविष्य आहेत. उज्ज्वल भारताच्या भविष्यासाठी या मुलांना शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज येथे केले.
बाल कामगार प्रथेचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने समाजाच्या विविध घटकामध्ये या प्रथेविषयी जनजागृती करण्यासाठी 7 नोव्हेंबर 2019 ते 7 डिसेंबर 2019 या कालावधीत जिल्हयात जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राम यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, कामगार उप आयुक्त विकास पनवेलकर, सहायक कामगार आयुक्त चेतन जगताप, सहायक कामगार आयुक्त अजित खरात, कामगार अधिकारी डी. डी. पवार, कामगार अधिकारी एस.एच. चोभे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राम म्हणाले, बालकामगार प्रथा बंद झाली पाहिजे. बालकांचे हरविलेले बालपण त्यांना मिळवून दिले पाहिजे. केवळ चरितार्थ चालत नाही म्हणून बालवयात कामगार म्हणून काम करणाऱ्या मुलांना त्यांचे हरविलेले बालपण परत मिळवून देण्यासाठी आता सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. घरकाम, विटभट्टीवर, बांधकाम, हॉटेल, कचरा/भंगार वेचणे अशा अनेक उद्योगात ही मुले काम करतात. अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. बालकामगारांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनामार्फत अनेक उपक्रम राबविले जात आहेत. बालकामगारांच्या या मोहीमेत स्वयंसेवी संस्थांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.

बालकामगारांना शाळेची विशेष गोडी लागावी यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात असल्याचे सांगून जिल्हाधिकारी राम म्हणाले, बालकामगार शिक्षणापासून वंचित असतात. बालकामगारांवर याबाबतीतील संस्कार करुन, शिकण्याची गोडी लावून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात.

बालकामगार मुक्तीच्या अभियानास समाजातील प्रत्येक घटकाने मदत केली तर बालकामगार प्रथा समूळ नष्ट होण्यास वेळ लागणार नाही असा विश्वासही राम यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविक करताना उप आयुक्त विकास पनवेलकर म्हणाले, या अभियानामध्ये विविध संस्थाचालक, मालक यांच्या बैठका घेवून बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम,1986 ची माहिती देणे, तसेच यावर चर्चासत्रे आयोजित करून आस्थापना मालक, चालक यांचेकडून बाल कामगार कामावर न ठेवणेबाबत हमीपत्र लिहून घेणे, दुकाने तसेच आस्थापनेमध्ये बालकामगार कामावर न ठेवणेबाबतचे स्टीकर दर्शनी भागात प्रदर्शित करणे, स्वयंसेवी संस्था, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचे सहकार्याने अत्यल्प उत्पन्न असणा-या पालकांचे प्रबोधन करणे, पत्रके वाटणे, वस्तीमधील लोकांना बाल कामगार निर्मूलन कार्यक्रमात सामावून घेणे, विविध प्रसार माध्यमातून बालकामगार प्रथेविरूध्द जनजागृती करणे, पथनाट्य प्रचार फेरी इत्यादी माध्यमातून जनजागृती करणे तसेच रेल्वे स्टेशन, बसस्थानक परिसरामध्ये बाल कामगार प्रथा विरोधी स्वाक्षरी मोहिम राबविणे इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बालकामागार जागृती संदर्भातील पोस्टर्सचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. यावेळी कामगार विभागाचे अधिकारी, कर्मचारी व स्वंयसेवी संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.