संकटात सापडलेला शेतकरी सरकारला सत्तेतून खाली खेचेल – सुप्रिया सुळे

Share this News:

मुळशी, दि.१० : राज्यभरात बेसुमार बेरोजगारी, शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न हे भाजप-सेना सरकारचे सर्वात मोठे अपयश आहे. शेतकऱ्यांचं कंबरडं मोडायचं काम केल्यामुळेच मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी भाजपला सत्तेतून खाली खेचले. त्याची पुनरावृत्ती या लोकसभा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत दिसून येईल, असा घणाघात खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी पिरंगूट येथे केला.

सुळे पुढे म्हणाल्या, “मुळशीकर हा नेहमीच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मागे ठामपणे उभा राहिला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस जसे दिल्लीत सख्या भावासारखे राहतात तसेच ह्यापुढे महाराष्टात सुद्धा राहतील. त्यासाठी मी स्वत: पुढाकार घेऊन प्रत्येक दोन महिन्यांनी सयुंक्त बैठका घेईल,” असा शब्द उपस्थित काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला.

त्या म्हणाल्या, “मी जरी विरोधातली खासदार असले तरी
केंद्रसरकारची महत्वकांक्षी “वयोश्री” योजना फक्त संघटनेच्या जीवावर देशात अव्वल क्रमांकाने यशस्वी करून दाखवली. या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठांना मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप बारामती मतदारसंघात झाले.”

संस्कृतीत ढवळाढवळ करणे सरकारचे काम नाही : सुप्रिया सुळे

“नागरिकांच्या अंतर्गत संस्कृतीत ढवळाढवळ करणे हे केंद्र व राज्य सरकारचे काम नाहीच. तर सरकारने नागरिकांच्या रोटी-कपडा-मकान या मूलभूत समस्या मार्गी लावाव्यात,”अशी टीका देखील सुळे यांनी यावेळी भाषणात केली.