पुलावरुन उडी मारणाऱ्या महिलेस अग्निशमन व जीवरक्षकांकडून जीवदान

11/9/2019, पुणे – आज सायंकाळी सहाच्या सुमारास संगमवाडी येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ असणाऱ्या पुलावरुन एका 30 वर्षीय महिलेने पाण्यात उडी मारली होती. त्या महिलेस वाचविण्यात अग्निशमन दल व जीवरक्षक यांना यश आले आहे. तसेच शहरात सलग दुसऱ्या दिवशी असा प्रकार घडला आहे. काल सांयकाळी म्हात्रे पुलावरुन अशीच एका इसमाने उडी मारली होती. त्याला ही वाचविण्यात अग्निशमन दलास यश आले होते.

संगम पुलाजवळ घडलेल्या घटनेवेळी महिलेने पुलावरुन उडी मारताच अग्निशमन दलाचे जवान चंद्रकांत सोनावळे व जीवरक्षक जगन तिकोणे, बापू तिकोणे, चेकन परदेशी व काळूराम टेमगिरे यांनी धाव घेतली. यावेळी लगेच बोट पाण्यात नेत त्या बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचविले गेले. बुडणाऱ्या महिलेला पाण्याबाहेर काढल्यानंतर महिलेस रुग्णालयात रवाना करण्यात आले. महिलेचे नातेवाईक लगेचच घटनास्थळी पोहोचले होते.

अग्निशमन दल जवान व जीवरक्षक यांच्यामुळे महिलेचे प्राण वाचले. त्यांनी तातडीने केलेले बचावकार्याने त्या महिलेस जीवदानच मिळाले असून पुढील उपचारासाठी तिला रुग्णालयात पाठविले आहे.