Govt positive about Pimpri Chinchwad police commissionerate

Share this News:

पोलीस आयुक्तालयासाठी सरकार सकारात्मक!
– भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची माहिती
– विधानसभा अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे २० लाखांहून अधिक आहे. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे. परिणामी, गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा ताण पोलिसांवर येत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करावे, अशी आग्रही मागणी आमदार महेश लांडगे यांनी विधानसभा अधिवेशनात केली.
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून (दि.२४ जुलै) सुरु झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर आमदार लांडगे यांनी विधानसभेत सरकारचे लक्ष वेधले. तसेच, भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप, आमदार गौतम चाबुकस्वार, शरद सोनवणे, राहुल कुल यांनी या मुद्यावर राज्य सरकारला सांकडे घातले आहे. 
दरम्यान, राज्य सरकारच्या वतीने गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याचे आदेश अधिका-यांना दिले आहेत. गृहविभागाच्या निर्देशानुसार पुणे पोलीस आयुक्तालयाने कार्यवाही करुन अहवालही सादर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: या प्रश्नात लक्ष घातले आहे. त्यामुळे आगामी काळात पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याबाबत लवकरच घोषणा होईल, अशी माहिती आमदार लांडगे यांनी दिली.
आमदार लांडगे म्हणाले की, नव्या पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पिंपरी-चिंचवड महापालिकेसह, चाकण, तळेगाव दाभाडे या औद्योगिक पट्ट्याचाही समावेश होण्याची शक्यता आहे. आयुक्तालयाचा प्राथमिक आराखडा तयार करून हद्द निश्चितीबाबतही विचार झाला आहे. पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या २२ लाखांच्या जवळपास आहे. याशिवाय चाकण, तळेगावचा विचार करता लोकसंख्या वाढीला वाव आहे. सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये एक उपायुक्त दर्जाचा अधिकारी असून, वाहतूक आणि विशेष शाखेसह अन्य वरिष्ठ अधिकारी पुण्यातील आयुक्तालयातून काम पाहतात. वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे गुन्हेगारी, जमिनीचे वाद आणि अन्य कारणांमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतंत्र आयुक्तालयाची नितांत गरज आहे. 
————-

मुख्यमंत्री उद्या घोषणा करणार?
राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर विकासकामांना गती मिळाली आहे. स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाबाबत यापूर्वीच घोषणा होण्याची शक्यता होती. मात्र, तांत्रिक अडचणी आणि अन्य बाबींमुळे विलंब झाला आहे. उद्या, दि. १२ ऑगस्टला मुख्यमंत्री पिंपरी-चिंचवडमध्ये येत आहेत. शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि स्थानिक प्रश्नांवर यावेळी सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. या दौ-यात मुख्यमंत्री स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची घोषणा करतील, अशी शक्यताही आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली आहे.