निवडणुकीच्या कामकाजात नारी शक्तीचा ठसा

Share this News:

18/10/2019,पुणे -पुणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी नवल किशोर राम यांनी विविध कक्ष स्थापन केले असून निवडणुकीचे कामकाज आता अंतिम टप्प्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण 21 मतदारसंघात 7 हजार 915 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यात 40 लाख 42 हजार 89 पुरुष मतदार असून 36 लाख 86 हजार 885 स्त्री मतदार तर 243 तृतीयपंथी मतदार आहेत. जिल्ह्यात एकूण 77 लाख 29 हजार 217 मतदार आहेत. निवडणूक कामकाजामध्ये 14 हजार 396 महिला अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीच्या कामकाजात महिला अधिकारी व कर्मचारी यांची संख्या लक्षणीय आहे.

 

उप जिल्हा निवडणुक अधिकारी म्हणून मृणालिनी सावंत कामकाज पाहत आहेत. तर कायदा व सुव्यस्था राखण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील व पोलीस उपनिरीक्षक श्यामल पाटील- पोवार, योगिता बोडके या पार पाडत आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयामधील उपायुक्त नयना बोंदार्डे, उपायुक्त साधना सावरकर, उपजिल्हाधिकारी स्नेहल बर्गे, उपजिल्हाधिकारी रुपाली आवले, तहसिलदार मनीषा देशपांडे व मीनल भामरे, नायब तहसिलदार अपर्णा तांबोळी या पुणे विभागाचे निवडणुक विषयक काम पाहत आहेत.

 

निवडणुकीचे कामकाज सुयोग्यरित्या पार पाडण्यासाठी प्रशासनाने विविध प्रकारच्या कामांची जबाबदारी विविध अधिकाऱ्यांवर सोपविली आहे. निवडणुक विषयक प्रशिक्षण अपर जिल्हाधिकारी ज्योत्स्ना पडियार व उपायुक्त वनश्री लाबशेटवार उत्तमपणे देत आहेत. आदर्श आचारसंहिता राबविण्यासाठी आवश्यक कामकाज उपजिल्हाधिकारी सुरेखा माने सांभाळत असून मतदार जनजागृती मध्ये महत्त्वपूर्ण असणारे स्वीप व्यवस्थापन (SVIP- सिस्टीमॅटीक वोटर्स एज्युकेशन ॲण्ड इलेक्टोरल पार्टीसिपेशन) उप मुख्य कार्यकारी अधिकारी आशाराणी पाटील करत आहेत. विविध बैठकांचे सुयोग्य नियोजन उपजिल्हाधिकारी गीतांजली शिर्के करत आहेत. मतदार मदत कक्षाच्या नियंत्रणाबरोबरच अन्य जबाबदाऱ्या उपजिल्हाधिकारी वर्षा पवार सांभाळत असून मतदान साहित्य पुरविण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांच्याकडे आहे.

 

वित्त व लेखा विभागाच्या उपसंचालक पद्मश्री तळदेकर या खर्च व्यवस्थापन निरीक्षकांच्या समन्वयक म्हणून सक्षमपणे भूमिका पार पाडत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता वर्षा सहाणे, विद्युत विभागाच्या उपअभियंता अनघा पुराणिक व नलिनी सुत्रावे या मतदान केंद्रस्थळी सोयी-सुविधा पुरवण्याबरोबरच तात्पुरते मतदान केंद्र स्थापन करणे तसेच विद्युत पुरवठा उपलब्ध करुन देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. दिव्यांग मतदारांना मतदान करणं सोयीचं होण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या समन्वयक रोहिणी मोरे विविध प्रकारचे उपक्रम राबवित आहेत. निवडणुक प्रक्रियेत संगणकीकरणाचे व्यवस्थापन अश्विनी करमरकर करत आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक यामिनी जोशी वाहतूक आराखड्याची जबाबदारी तर विधी अधिकारी स्वाती पंडित या विधी कक्षाव्दारे कायदेविषयक जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहेत. निवडणुक शाखेच्या तहसीलदार रुपाली रेडेकर व नायब तहसीलदार नेहा चाबुकस्वार विविध प्रकारचे विषय हाताळत आहेत. तसेच एक खिडकी योजनेव्दारे तहसीलदार सुनिता आसवले माहिती देत असून मिडिया सेंटर मध्ये सहायक संचालक वृषाली पाटील व नायब तहसिलदार शैलजा तारु कार्यरत आहेत.

 

जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघात निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अनुक्रमे आरती भोसले, मनिषा कुंभार, वैशाली इंदाणी, रेश्मा माळी, अस्मिता मोरे, निता सावंत- शिंदे या महिला अधिकारी सक्षमपणे काम पाहत आहेत.

 

सहायक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार अनुक्रमे रमा जोशी, सुचित्रा अमले पाटील, लैला शेख, सोनाली मेटकरी, रुपाली सरनोबत, राधिका बारटक्के, रोहिणी आखाडे, दिप्ती रीठे, रंजना ढोकळे, स्मिता पवार, सुरेखा दिवटे, तृप्ती कोलते- पाटील या महिला अधिकारी उत्कृष्टपणे कामकाज पार पाडत आहेत.

 

मतमोजणी व्यवस्थापनाचे काम अपर जिल्हाधिकारी नंदिनी आवाडे यांच्याकडे आहे. याशिवाय जिल्ह्यात विविध पथकांमध्ये तसेच विविध कक्षांव्दारे महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या महिला अधिकारी व कर्मचारी सक्षमपणे सांभाळत आहेत.