इंद्रायणी थडी महाराष्ट्रात ‘भारी’; चाखायला या गावरान पिठलं अन्‌ भाकरी!

24/1/2020, पिंपरी । प्रतिनिधी

– महाराष्ट्रासह परराज्यातील खाद्यपदार्थांचा जत्रेत अस्सल स्वाद
– शिवांजली सखी मंचतर्फे खाद्य महोत्सवाची जय्यत तयारी

जत्रा म्हटलं की, खाद्यपदार्थांची लज्जत आणि स्वाद आलाचं… महाराष्ट्रासह परराज्यातील प्रमुख खाद्यपदार्थांची मेजवानी यंदा ‘इंद्रायणी थडी’ जत्रेत चाखायला मिळणार आहे. तब्बल ३०० हून अधिक विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल जत्रेकरिता ‘बूक’ झाले आहेत. विशेष म्हणजे, शितपेय, मिल्क पार्लर, आईस्क्रिम सेंटर यासह स्नॅक्स आणि मिठाईचेही भरगच्च स्टॉल जत्रेत लावण्यात येणार आहेत. त्यामुळे भोसरीतील जत्रेत महाराष्ट्रभरातील खवय्यांची चांगलीच हौस होणार आहे.

पिंपरी-चिंचवडचे भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानावर महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा ‘इंद्रायणी थडी’ भरविण्यात येणार आहे. दि. ३०, ३१ जानेवारी आणि १, २ फेब्रवारी २०२० असे चार दिवस, सकाळी १० ते सायंकाळी १० या वेळेत ही जत्रा नागरिकांसाठी खुली राहणार आहे.

जत्रेत महाराष्ट्रीय पुरणपोळीसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आदी भागांतील प्रमुख खाद्यपदार्थांची चव चाखायला मिळणार आहे. वास्तविक, पिंपरी-चिंचवड शहरात देशभरातील विविध प्रांतातून नागरिक रहायला आले आहेत. महाराष्ट्रातील ‘मिनी इंडिया’ अशी या कामगारनगरीची ओळख आहे. याठिकाणी डालबाटी, छोले बटोरे, अप्पम, हैद्राबादी बिर्याणी, दही बल्ले, राजमा रोटी अशा विविध पदार्थांचा स्वाद घेता येणार आहे, अशी माहिती शिवांजली सखी मंचच्या प्रमुख पुजा महेश लांडगे यांनी दिली.

जत्रेचे समन्वयक संजय पटनी म्हणाले की, सुमारे १२ एकर परिसरात ८०० पेक्षा जास्त स्टॉल जत्रेत उभारण्यात आले आहेत. त्यापैकी ४७३ स्टॉल विविध खाद्यपदार्थ आणि पेय प्रकारांसाठी निश्चित केले आहेत. या जत्रेत नागरिकांना व्‍हेज बिर्याणी, व्‍हेज थाळी, चिकण लॉलीपॉप, चायनिज भेळ, मटर पनीर रोटी, मोमोज, पुरणपोळी, समोसा, दाबेली, विविध तंदूरचे प्रकार, उत्तप्पा, ठेचा भाकरी, लापसी आदी पदार्थांचा स्वाद घेता येणार आहे.

महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा निशुल्क…

विशेष म्हणजे, महराष्ट्रातील सर्वांत भव्यदिव्य जत्रा इंद्रायणी थडीमध्ये खाद्यपदार्थांव्यतिरिक्त सर्व मनोरंजन खेळ, देखावे, बालजत्रा, लेझर शो, झुंबा डान्ससह विविध कार्यक्रम पाहण्यासाठी कसलाही खर्च करावा लागणार नाही. नागरिक जत्रेत आल्यानंतर आपल्या आवडीनुसार खाद्यपदार्थांचा स्वाद घेतली. अनेक पदार्थ सवलतीच्या दरांत उपलब्ध करुन दिले आहेत. मात्र, जत्रेच्या प्रवेशासाठी कसलेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच, जत्रेतील सर्व कार्यक्रम पूर्णपणे विनामुल्य आहेत, अशी माहिती संयोजकांनी दिली.

झणझणीत इंद्रायणी थडीत तांबडा अन्‌ पांढरा रस्सा…

इंद्रायणी थडी जत्रेमध्ये अस्सल कोल्हापूरी झटका असलेला तांबडा रस्सा आणि पांढरा रस्स्यावर ताव मारता येणार आहे. यासह खानदेशी मांडे, शिंगोळे, पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध मासवडी, कोकणातील मासे, कोंबडी वडे, आळू वड्या सुरळीच्या वड्या, विदर्भातील पाठवड्या, मिरची भाजी, शेगाव कचोरी, मराठवाड्यातील थालीपीठं, नागपूरचे सावजी मटण, कृष्णा-वारणे काठची भरली वांगी, मावळातील इंद्रायणी तांदळाचा मसाले भात, कोथिंबीड वड्या यासह रबडी जिलेबी, बासुंदी, गाजर हलवा, मूग भजी, मशरुमचे विविध प्रकार, हुर्डा, कडीवडे, उकडीचे मोदक आदी जत्रेतील आकर्षणे ठरणार आहेत.

लहानग्यांसाठी पॉपकॉर्न अन्‌ बुड्डी के बाल…

भोसरी विधानसभा मतदार संघात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून नागरिक स्थायिक झाले आहेत. या भागातील नागरिक मोठ्या संख्येने या जत्रेला हजेरी लावणार आहेत. जत्रेत बालजत्रा हे प्रमुख आकर्षण असले तरी लहानग्यांसाठी पॉपकॉर्न, स्वीटकॉर्न, बुड्डी के बाल, चिनीमिनी बोरं, चिंच, पाणी पुरी, भेळ पुरी, चाट, आईस्क्रिम, कुल्पीचे विविध प्रकार, केक, पेस्ट्रीसह चॉकलेट, उसाचा रस आदी खाद्यपदार्थ उपलब्ध करण्यात येणार आहेत.