सुमारे साडेचार लाख विद्यार्थ्यांचे अर्धे शुल्क शासनाने भरले – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

Share this News:

कोल्हापूर, दि. 4/8/2019 : राज्य शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ईबीसी सवलत योजनेची उत्पन्न मर्यादा 8 लाख रुपये केल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य झाले आहे. या योजनेनुसार गेल्या वर्षी राज्य शासनाने राज्यातील4 लाख 56 हजार विद्यार्थ्यांचे अर्धे म्हणजेच निम्मी म्हणजे 650 कोटीचे शुल्क भरले आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

 

सम्राटनगर प्रभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आला. कार्यक्रमास नगरसेविका जयश्री जाधव, उद्योगपती चंद्रकांत जाधव, संभाजी जाधव, निवृत्त पोलीस उप अधीक्षक सतीश माने आदी उपस्थित होते.

 

मुला-मुलींच्या शिक्षणावर अधिक भर देण्याची भूमिका राज्य शासनाने स्वीकारली असल्याचे सांगून महसूलमंत्री श्री. पाटील म्हणाले,  मुलींना 12 वी पर्यंतच्या मोफत शिक्षणाबरोबरच 12 वीपर्यंत एस.टी.पासही मोफत दिला जातो. त्यामुळे आता मुलींना शिक्षण घेणे अधिक सोईचे झाले आहे. याबरोबरच राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना कार्यान्वित केली तसेच ईबीसी सवलत योजनेची उत्पन्न मर्यादा 1 लाखावरुन थेट 8 लाख करण्याच्या क्रांतिकारी निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना वैद्यकीय तसेच अभियांत्रिकेचे शिक्षण घेणे आता सोईचे झाले आहे. परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृती, युपीएसचा अभ्यास करणाऱ्यांसाठीही सुविधा दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

 

शिक्षणाबरोबर कौशल्य प्रशिक्षणावरही शासनाने अधिक भर देवून विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच एनसीसी, एनएसएस तसेच खेळामध्ये सहभागी होवून सार्वजनिक कामात सक्रिय होणे काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले.

 

जिल्ह्यातील एकही मुलगी पैसे नाहीत म्हणून शिक्षण आणि खेळापासून वंचित राहणार नाही यासाठी आवश्यक उपाय योजनांना प्राधान्य दिल्याचे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील गरीब आणि गरजू मुलींना आर्थिक मदत करुन त्यांना शिक्षणाची दारे खुली करण्यावर भर दिला आहे. क्रीडा क्षेत्रातही भरीव कामगिरी मुलींकडून व्हावी यासाठी खेळाडू मुलींनाही आवश्यक असणारी सर्व ती मदत केली जात आहे.

 

प्रारंभी नगरसेविका जयश्री जाधव यांनी स्वागत करुन सम्राटनगर प्रभागामध्ये राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा दरवर्षी गुणगौरव केला जात असून यापुढील काळात विद्यार्थ्यांना अधिकाअधिक मदत करण्याची भूमिका घेतली जाईल असे त्या म्हणाल्या.  या समारंभास प्रकाश चांडक, दिलीप पेटकर यांच्यासह ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी,विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.