गडकिल्ल्यांसंदर्भात येत असलेल्या चुकीच्या बातम्यांच्या अनुषंगाने , पर्यटन विभागाचे स्पष्टीकरण

Share this News:

मुंबई, दि. 6/9/2019 : राज्यातील वर्ग 1 चे किल्ले हे संरक्षित वर्गवारीत येतात. केंद्र आणि राज्य सरकारचा पुरातत्त्व विभाग या किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करीत आहे आणि त्या किल्ल्यांच्या विकासाचा स्वतंत्र कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा म्हणूनच ते जतन करण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित किल्ले हे कुठल्याही परिस्थितीत ऐतिहासिक अर्थानेच जपले जातील आणि त्याचे पावित्र्य तसेच कायम राखले जाईल, असे स्पष्टीकरण पर्यटन विभागाने केले आहे.

गडकिल्ल्यांसंदर्भात येत असलेल्या चुकीच्या बातम्यांच्या अनुषंगाने पर्यटन विभागाच्या सचिव विनीता सिंगल यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

स्पष्टीकरणात म्हटले आहे की, राज्यात दोन प्रकारचे किल्ले आहेत. एक वर्ग 1 आणि दुसरे वर्ग 2. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे वर्ग 1 मध्ये येतात आणि अन्य सुमारे 300 किल्ले हे वर्ग 2 मध्ये येतात. राज्यातील वर्ग 1 चे किल्ले हे संरक्षित वर्गवारीत येतात. केंद्र आणि राज्य सरकारचा पुरातत्त्व विभाग या किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करीत आहे आणि त्या किल्ल्यांच्या विकासाचा स्वतंत्र कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा म्हणूनच ते जतन करण्यात येतील. मात्र वर्ग 2 चे किल्ले हे असंरक्षित वर्गवारीत येतात. त्याचा पर्यटन विकासासाठी ऐतिहासिक स्थळे म्हणून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे हे किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एका वर्तमानपत्राच्या बातमीच्या आधारे कृपया चुकीचे अर्थ काढण्यात येऊ नये, असे पर्यटन विभागाने स्पष्ट केले आहे.