महारुद्र सोशल आर्गेनाईजेशनचा पुढाकार, पूरग्रस्त भागात ११०० संच शैक्षणिक साहित्याची मदत 

Share this News:
 

पुणे, 27/8/2019 : महाराष्ट्राच्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावे पूरात वाहून गेली. पूरग्रस्त भागातील नागरिकांना त्यांचा संसार उभा करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मदत मिळत आहे. या पूरामध्ये शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांचे देखील तितकेच नुकसान झाले आहे. त्यामुळे पुण्यातील महारुद्र सोशल आर्गेनाईजेशन , महारुद्र वाद्य पथक या संस्थेने पुढाकार घेत पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी शालेय साहित्याची मदत संस्थेकडून देण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांची शैक्षणिक साहित्याची तुला करुन ही मदत पाठविण्यात आली.

पुण्यातील महारुद्र सोशल आर्गेनाईजेशन , महारुद्र वाद्य पथकाच्यावतीने सांगली, कोल्हापूर जिल्हातील गावातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत देण्यात आली. नवी पेठेतील विठ्ठल मंदिरात सामाजिक कार्यकर्त्यांची शैक्षणिक साहित्य तुला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे विश्वस्त शिरीष मोहिते, ढोलताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप या समाजात उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्ती तसेच शहीद जवान विजय मोरे यांच्या वीरपत्नी दिपाली मोरे यांची शैक्षणिक साहित्याने तुला करण्यात आली.

 कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. कल्याण शिंदे, संतोष देशमुख, हेमंत चौधरी, गिरीष घोलप, प्रशांत जठार, अनिल नवले, दादा गायकवाड, जगदीश बोथाटे, अनिल शिंदे, प्रदीप सांडभोर, रविंद्र खिलारे, प्रताप ढमाले,सचिन शेलार, उल्हास खेडकर, सुनील मोरे, संदिप गाडे आदी मान्यवर उपस्थित होते. हे शैक्षणिक साहित्य पूरग्रस्त भागातील १३ गावातील शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. वह्या, पेन, पेन्सिल, रबर अशा शालेय साहित्याचे ११०० संच मदत स्वरूपात देण्यात आले आहे.

पराग ठाकूर म्हणाले, मजेसाठी एकत्र जमणे आणि सामाजिक कार्याचा सेतू बांधण्यासाठी एकत्र येणे यामध्ये फरक असतो. अनेकांनी पूरग्रस्त भागीतील लोकांना मदत दिली. परंतु ती मदत प्रत्यक्ष त्या लोकांपर्यंत पोहोचविणे ही देखील मोठी गोष्ट आहे. मुलांना शैक्षणिक साहित्य मिळाल्यानंतर त्यांच्या चेह-यावरील समाधान पाहणे आनंददायी आहे. ज्याला माणसांचे चेहरे वाचता येतात, तो कोणत्याही सामाजिक कार्यासाठी तत्पर असतो.

अ‍ॅड. कल्याण शिंदे म्हणाले, पूर आल्यानंतर संपूर्ण घरे पाण्यात वाहून गेली. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य देखील वाहून गेले. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात शैक्षणिक साहित्याअभावी कोणतेही अडथळे येवू नये, यासाठी संस्थेने पुढाकार घेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत दिली आहे. यामध्ये ६ वह्या, पेन, पेन्सील, रबर अशा शालेय वस्तूंचा संच विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रशांत जठार यांनी सूत्रसंचालन केले. दादा गायकवाड यांनी आभार मानले.