आमदार महेश लांडगे यांचा मास्टरस्ट्रोक राष्ट्रवादीचा सुपडा साफ; आजी-माजी पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

भोसरी, 10 ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आजी-माजी पदाधिका-यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पदाधिका-यांचे भारतीय जनता पक्षात स्वागत केले. आमदार महेश लांडगे यांनी दिलेल्या या मास्टरस्ट्रोकमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा पिंपरी चिंचवड शहरातून सुपडा साफ झाला आहे.

राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष वसंत लोंढे, माजी उपमहापौर शरद बो-हाडे, च-होलीचे माजी नगरसेवक घनश्याम खेडकर, माजी नगरसेविका आशा सुपे, नगरसेविका विनया तापकीर यांचे पती प्रदीप तापकीर, राष्ट्रवादीकडून 2017 साली महापालिकेची निवडणूक लढवलेले संजय पठारे, चिखलीचे सुनील लोखंडे, निलेश नेवाळे, एस डी भालेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

चिंचवड येथील कार्यक्रमात या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे च-होली, चिखली, मोशी आणि दिघी या चार गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बूथ लावण्यासाठी देखील कार्यकर्ते उरले नसल्याची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

वसंत लोंढे यांचा राष्ट्रवादीने 20 वर्ष वापर केला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून माळी समाजाचे नेतृत्व करणारे ओबीसीचे नेते वसंत लोंढे पक्षप्रमुख शरद पवार यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. पण त्यांचा केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वापर करून घेतला. सर्व पदांपासून त्यांना वंचित ठेवण्यात आले. तब्बल 20 वर्ष त्यांना महापौर पद, विधानसभा उमेदवारी न देता त्यांना वेळोवेळी डावलण्यात आले आहे. ती अन्यायाची चिढ मनात घेऊन त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, मागील पाच वर्षात आमदार महेश लांडगे यांनी जे सर्व समावेश, सर्व समाजाच्या लोकांना बरोबर घेऊन काम केले, त्या कामापासून प्रेरित होऊन त्यांनी आमदार महेश लांडगे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. समाविष्ट गावांना आमदार महेश लांडगे यांनी दिलेला न्याय, त्यांना भावला आहे. 2017 सालीच आम्ही प्रवेश करणार होतो, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काही आमिषे दाखवली. त्यामुळे त्या अमिशांना बळी पडून प्रवेश रखडला असल्याचे वसंत लोंढे यांनी सांगितले. आता भारतीय जनता पार्टीच्या मी मुख्य प्रवाहात आलो असून यापुढे भारतीय जनता पक्षाचे सक्रियपणे काम करणार असल्याचेही ते म्हणाले.