एनडीए रस्ता रुंदीकरणास संरक्षण खात्याचा हिरवा कंदील : गिरीश बापट

नवीदिल्ली, ता.12 ( प्रतिनिधी) : चांदणी चौका नजिकच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( एनडीए) रस्त्याच्या रुंदीकरणास संरक्षण खात्याने बुधवारी हिरवा कंदील दाखविला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नवीदिल्ली येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. अशी माहिती खासदार गिरीश बापट यांनी पत्रकारांना दिली.

 

चांदणी चौकातील दुमजली उड्डाणपूल प्रकल्पात या रस्त्याचा समावेश होतो. असे सांगून बापट म्हणाले की, रुंदीकरण करतांना एनडीएला भव्य प्रवेशद्वार,सीमाभिंत, स्वछतागृहे व अभ्यागत कक्ष बांधून दिले जाणार आहे. हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत होणार आहे. चांदणी चौकातील नियोजित रस्ता ३० मीटर रुंदीचा होणार आहे. तो करून देतांना एनडीएला कमानीसह भव्य प्रवेशद्वार उभे करून द्यायचे आहे. संरक्षण खात्याची जागा वापरण्याच्या बदल्यात ही कामे करून देण्याचे या बैठकीत तत्वश: मान्य करण्यात आले. तिथे स्वतंत्र पार्किंग व सुरक्षारक्षकांसाठी सोयी सुविधा व स्ट्रीट लाईट्सही उपलब्ध करून देण्याचे ठरले. तसेच खडकी येथील मेट्रोचे बांधकाम करतांना संरक्षण खात्याची परवानगी लागणार आहे. त्यासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या किंमती इतक्याच पायाभूत सुविधा संरक्षण खात्याला त्यांच्या संमतीने अन्यत्र उपलब्ध करून द्याव्यात .अशी सूचना नितीन गडकरी यांनी केली. त्याबाबत संरक्षण खात्याची उच्चस्तरीय समिती निर्णय घेईल. असे आश्वासन केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी दिले. या बैठकीत लोहगाव विमानतळावरील उड्डाणांची संख्या वाढविण्याबाबतही चर्चा झाली.

 

विमानतळावरील प्रवाशांची वाढती संख्या विचारात घेऊन रात्रीच्या विमान उड्डाणांत वाढ करावी. या प्रस्तावाला तत्वश: मान्यता देण्यात आली. तसेच विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी संरक्षण खात्याची आणखी काही जमीन ताब्यात घ्यावी लागणार आहे. त्याजागे एवढीच जमीन संरक्षण खात्याला अन्यत्र द्यावी. अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. तसेच विमानतळावरील पार्किंगची अपुरी जागा, रस्त्याचे रुंदीकरण व वाहतूक कोंडी या मुद्द्यांवरही चर्चा झाली. या बैठकीचे इतिवृत्त संरक्षण खात्याने मंजूर केल्यावर प्रत्यक्ष काम सुरू होईल. विमानतळ प्राधिकरण व हवाईदलाच्या अधिकाऱ्यांची लवकरच बैठक होईल. त्यात याबाबत अंतिम निर्णय होईल असेही बापट यांनी सांगितले.