आमदार महेश लांडगे यांनी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांचा घेतला आढावा प्रश्न मार्गी लावण्याच्या अधिका-यांना सूचना

Share this News:

पिंपरी, 25 जून – चिखलीतील जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाचे काम हाती घ्यावे. ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला चालना द्यावी. समाविष्ट गावात ‘टीपी स्कीम’नुसार विकास कामे करावीत. 24 तास पाणी पुरवठा योजनेच्या कामाला गती द्यावी. पाणी पुरवठा सुरळित करावा. भोसरीतील रुग्णालयात ‘ओपीडी’ सुरु करावी. विकास आराखड्यातील रस्ते, उद्यानाची कामे मार्गी लावावीत, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी महापालिका अधिका-यांना दिल्या. तसेच ‘परिवर्तन’ हेल्पलाईनवर येणा-या तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या.भोसरीत मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आणि चालू असलेल्या विकास कामांचा आमदार महेश लांडगे यांनी आज (मंगळवारी)आढावा घेतला. महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम, विद्युत विभागाचे प्रवीण तुपे, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, संजय कुलकर्णी, नगररचना व विकास विभागाचे उपसंचालक राजेंद्र पवार, वायसीएमचचे अधिष्ठता डॉ. राजेश वाबळे, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, नितीन बो-हाडे बैठकीला उपस्थित होते.आमदार लांडगे म्हणाले, एकदिवसाआड पाणीपुरवठा करुन देखील नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. दिघी परिसरात चार-चार दिवस पाणी येत नाही. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना मुबलक पाणी देण्यात यावे. बो-हाडेवाडीत पाण्याची टाकी बांधावी. नागरिकांना ‘टीपी स्कीम’ची माहिती द्यावी. बो-हाडेवाडीतील शाळेत पटसंख्येनुसार शिक्षक उपलब्ध करुन द्यावेत.लांडगे म्हणाले, नागरवस्ती विभागाच्या योजनांचा दिव्यांग नागरिकांना लाभ देण्यात यावा. चिखली परिसरात स्वच्छता राखण्यात यावी. चिखलीतील प्राथमिक आरोग्य केंद्र विकसित करावे. नदीप्रदुषण आणि भंगार व्यावसायिक कचरा जाळत असल्याने धुराचे प्रमाण वाढत आहे. त्यावर कायमचा तोडगा काढण्यात यावा. विकास आराखड्यातील रस्ते, उद्यानाची कामे सुरु करावीत. च-होलीतील आरक्षित जागेवर समाज मंदिर बांधण्यात यावे. पाण्याच्या टाकीसाठी वन विभागाशी बैठक घेऊन जागा उपलब्ध करावी.ड्रेनेजची दुरुस्ती करण्यात यावी. शास्त्री चौकातील प्रलंबित असलेला रस्ता मार्गी लावावा. गव्हाणे वस्तीतील रस्त्याचे डांबरीकरण करावे. भोसरी गावठाणातील भूमिगत जलनिस्सारणची कामे पुर्ण करावीत. पथदिवे वेळेवर लावावेत. नाल्यांची साफसफाई करावी. प्राधिकरणाने महापालिकेकडे हस्तांतरित केलेल्या भूखंडावर सीमाभिंत बांधावी. अतिक्रमण होणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी. प्राधिकरणाच्या जागेतील मिळकतधारकांना सोयी-सुविधा देण्यात याव्यात. गायरान जमिनीबाबत हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु करावी, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी अधिका-यांना दिल्या.आळंदीरोड, शास्त्री चौक ते चक्रपाणी वसाहत येथील 30 मीटरचा रस्ता तातडीने मार्गी लावा!आळंदीरोड, शास्त्री चौक ते चक्रपाणी वसाहत येथील 30 मीटर रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. त्याच्या मागचा पुढचा रस्ता झाला आहे. परंतु, 30 मीटर रस्त्याचे काम रखडले आहे. या रस्त्यावरुन 30 हजारहून अधिक नागरिक ये-जा करतात. शाळेतील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचे जाणे येणे असते. 30 मीटर रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता रेडझोनमध्ये असला तरी त्यावर तोडगा काढावा आणि रस्त्याचे काम मार्गी लावावे, अशा सूचना आमदार लांडगे यांनी केली. त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नगररचना व विकास विभागाचे उपसंचालक राजेंद्र पवार यांना या रस्त्यावर तोडगा काढण्याचे निर्देश दिले आहेत.