गो-दान… भोसरीचे आमदार महेश लांडगे ठरले ‘देवदूत’

Share this News:

26/08/2019,पिंपरी । प्रतिनिधी ।

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांत शेत-यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी विधायक उपक्रम हाती घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांचे पशुधन महापूरात वाहून गेले अथवा मृत्युमूखी पडले आहे. अशा शेतकऱ्यांना गो-दान करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, ‘आस्मानी’ संकटामध्ये आमदार लांडगे आमच्यासाठी ‘देवदूत’प्रमाणे धावून आले, अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

 

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी महापूर आला. त्यामध्ये हजारो शेतकऱ्यांचे आयुष्य उद्धवस्त झाले. हजारो जनावरे पुरात मृत्युमूखी पडली आहेत. शेतकऱ्यांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्या. या हेतूने आमदार लांडगे यांनी तात्काळ ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम हाती घेतला. त्याद्वारे पूर ओसरल्याच्या दुसऱ्याच दिवशी तब्बल ४० ट्रक जीवनावश्यक वस्तूंचे सामान पूरग्रस्त भागात पोहोच करण्यात आले. विशेष म्हणजे, आमदार लांडगे समर्थक सर्व नगरसेवकांनी एक-एक गावाला भेट देवून पूरग्रस्तांना मदत केली. त्यावेळी पूरग्रस्त शेतकऱ्यांना जीवनावश्यक वस्तुंची मदत हवी आहेतच, त्यासोबत त्यांचे पुढील दोन वर्षांत भरुन न येणारे नुकसान झाले आहे. त्यांना उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे, ही बाब लक्षात आहे.

 

दरम्यान, आपल्या सर्व समर्थक नगरसेवक, कार्यकर्त्यांशी चर्चा करुन आमदार लांडगे यांनी ‘पशुधन’ दान करण्याबाबत राज्यातील सार्वजनिक गणेश मंडळ, दहिहंडी उत्सव मंडळ, सार्वजनिक विश्वस्त संस्था, सामाजिक संघटनांना आवाहन केले. आमदार लांडगे यांनी केलेल्या आवाहनाला भोसरी विधानसभा मतदार संघात चांगला प्रतिसाद मिळाला. आमदार लांडगे यांनी स्वत: याबाबत खर्च करण्याची तयारी ठेवली आहे, अशी माहिती सांगली-कोल्हापूर-सातारा (साकोसा) मित्र मंडळाचे सुनील जाधव यांनी दिली.

 

पहिल्या टप्प्यात ३६ गाईंचे होणार दान

 

‘पशुधन दान’ उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात आमदार महेश लांडगे आणि संबंधित स्वयंसेवी संस्था, संघटना, दानशूर नागरिक यांच्या पुढाकाराने एकूण ३६ गायींचे विधीवत दान करण्यात येणार आहे. भोसरीतील लांडगेनगर येथे श्रावणी सोमवारचे औचित्य साधून विधीवत गोपूजन करण्यात आले. त्यानंतर गो-दान विधी करण्यात आला. दान करण्यात आलेल्या एकूण ३६ गायींपैकी २५ गाईंचे दान दानशूर व्यक्तींनी, तर आमदार लांडगे यांनी स्वखर्चातून ११ गाईंचे दान केले आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने पूरामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या पशुधनाचा पंचनामा केला आहे. त्या यादीद्वारे ज्या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह पशुधनावर अवलंबून आहे, अशा शेतकऱ्यांची निवड करुन त्यांना गो-दान करण्यात येणार आहे. सर्व गायींचे दान त्या-त्या गावात जावून मी स्वत: करणार आहे, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.