विरोधकांवर वैयक्तिक टीका न करता ‘पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट’चे आमदार महेश लांडगे यांचे आवाहन

mahesh landge
Share this News:
पिंपरी, 12 सप्टेंबर 2019 – आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. तसे आरोप-प्रत्यारोप सुरु होणार आहेत. मात्र, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी राजकारण्यांसमोर नवा आदर्श निर्माण घालून दिला आहे. ‘पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट’ करत विरोधकांकडून झालेल्या टीकेला सोशलमिडीयावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये असे आवाहन लांडगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. आगामी काळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू शकतात. त्यापार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी नवा आदर्श घालून दिला आहे. ‘पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट’ अशी पोस्ट आमदार लांडगे यांनी सोशलमिडीयावर शेअर केली आहे.
त्यात आमदार लांडगे म्हणतात, कोणत्याही क्षणी निवडणूक आचारसंहिता घोषित होऊन निवडणुकीचे बिगूल वाजतील. आपण केलेल्या कामांविषयी, प्रलंबित प्रश्नांवरच्या आपल्या यशस्वी पाठपुराव्यावर तसेच आपल्या नाविन्यपूर्ण व्हिजन 20-20 संबंधी गैरसमजुतीतून, अज्ञानानतून किंवा वैयक्तित आकसातून विरोधकांकडून टीका-टिप्पणीना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया सोशलमिडीया व इतर माध्यमातून देऊ नये. विकासाभिमुख राजकारण हीच भोसरी मतदारसंघाची खरी ओळख बनवायची आहे. आदरपूर्वक सुसंस्कृत राजकारण करुन आपण एक नवा आदर्श निर्माण करुया..तुमची साथ मिळेल हीच अपेक्षा…
निवडणूका पाच वर्षात एकदाच येतात. तरी, आपण दहा दिवसाच्या निवडणुकीसाठी आपल्या आयुष्यातील महत्वाचे नातेवाईक, मित्र परिवार, सहकारी, समाजातील मान्यवर यांच्या सोबतचे संबंध खराब करु नका असे आवाहन आमदार लांडगे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
आमदार महेश लांडगे म्हणाले, “आरोप-प्रत्यारोपाचे जनतेला काही देणे-घेणे नसते. जनतेला त्याचा संताप येतो. विकासकामे महत्वाची आहेत. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप करणे योग्य नाही. राजकारणात आदर राखला गेला पाहिजे. त्यामुळे वैयक्तिक टीका करु नये असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.