MSEDCL Regional Director Meet

Share this News:

पुणे, दि. 20 : थकीत देयकांमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या वीजग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी येत्या दि. 1 नोव्हेंबर पासून विशेष योजना सुरु होत आहे. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश महावितरणचे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी गुरुवारी (दि. 20) दिले.

रास्तापेठ येथील महावितरणच्या प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात पुणे परिमंडलाच्या आढावा बैठकीत प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे उपस्थित होते.

प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे म्हणाले, येत्या दि. 1 नोव्हेंबरपासून सुरु होणार्‍या थकबाकीमुक्तीच्या योजनेत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या सर्वच वीजग्राहकांना सहभागी करून घेण्यात यावे. ही योजना सहा महिन्यांपर्यंत सुरु राहील. येत्या दि. 30 नोव्हेंबरपर्यंत मूळ थकबाकीच्या भरण्यामध्ये 5 टक्के व व्याज, विलंब आकाराची 100 टक्के रक्कम माफ होणार आहे. तसेच पहिल्या तीन महिन्यांत मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराची 100 टक्के रक्कम माफ होईल. तर योजनेच्या पुढील तीन ते सहा महिन्यांपर्यंत मूळ थकबाकी आणि 25 टक्के व्याजाच्या रकमेचा भरणा केल्यास 75 टक्के व्याज व विलंब आकाराची 100 टक्के रक्कम माफ होणार आहे.

मूळ थकबाकीच्या रकमेचा भरणा करण्यासाठी महावितरणच्या संकेतस्थळावर ‘ऑनलाईन’ सोय व संबंधीत ग्राहकांच्या थकीत देयकांची माहिती उपलब्ध करण्यात येत आहे. थकबाकीची रक्कम धनादेशद्वारेही रक्कम स्वीकारली जाणार आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी मूळ थकबाकीची 2 टक्के रक्कम भरण्याची अट रद्द केल्याचे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी सांगितले. या योजनेच्या पूर्वतयारीचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. वीजग्राहकांना सेवा देण्यासाठी तसेच त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कायम तत्पर राहावे. सोबतच थकबाकीदार वीजग्राहकांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्याची सुरु असलेली मोहीम तीव्र करण्याची सूचना यावेळी श्री. ताकसांडे यांनी केली.

या बैठकीला महावितरणचे अधीक्षक अभियंता सर्वश्री महेंद्ग दिवाकर, अरुण थोरात, सुंदर लटपटे, रमेश मलामे, सुनील पावडे, वादिराज जहागिरदार, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) श्री. अलोक गांगुर्डे, उपमहाव्यवस्थापक (माहिती व तंत्रज्ञान) श्री. एकनाथ चव्हाण, सहाय्यक महाव्यवस्थापक (एचआर) श्री. धैर्यशील गायकवाड आदींसह कार्यकारी अभियंते व अधिकारी उपस्थित होते.