नववा आरोग्य चित्रपट महोत्सव २० व २१ डिसेंबरला

Share this News:

पुणे, १६ डिसेंबर २०१९ : पी. एम. शहा फाऊंडेशनतर्फे येत्या शुक्रवारी व शनिवारी अर्थात २० व २१ डिसेंबरला विधी महाविद्यालय रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात (एनएफएआय) नवव्या आरोग्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रस्त्यावर फिरणार्‍या निराधार मनोरुग्णांच्या उपचार व पुनर्वसनासाठी अथक प्रयत्न करणारे रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ भारत वाटवाणी यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. शुक्रवार दि. २० डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात हा कार्यक्रम होणार आहे. तर २१ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रसिदध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा होणार आहे.

पी. एम. शहा फाऊंडेशनचे संचालक अॅड. चेतन गांधी यांनी ही माहिती दिली. या महोत्सवाची व्याप्ती वर्षागणिक वाढत असून भारतातील विविध ठिकाणांहून आणि परदेशातूनही आरोग्यासंबंधीचे संवेदनशील विषय हाताळणारे चित्रपट प्राप्त होत आहेत. या वर्षी संस्थेकडे अमेरिका, लंडन, फ्रान्स, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, स्पेन, अफगाणिस्तान, पाकिस्तान, दुबई असे जगभरातून १५० पेक्षा जास्त आरोग्य चित्रपट आले होते. यातील निवडक असे ३५ चित्रपट महोत्सवात दाखविले जाणार आहेत. केवळ मराठी, हिंदी आणि इंग्लिशच नव्हे तर बंगाली, ओडिया, तामिळ, मणिपुरी, मल्याळम, फ्रेंच, बलुची, फारसी आणि स्लोव्हाकियन भाषांमधील आरोग्यविषयक लघुचित्रपट आणि माहितीपट यात बघायला मिळणार आहेत. हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

महोत्सवासाठी निवडल्या गेलेल्या चित्रपटांपैकी तीन लघुपट व तीन माहितीपटांना प्रमुख अतिथींच्या हस्ते बक्षीसे दिली जाणार आहे. या वर्षी चित्रपट अभ्यासक विनय जवळगीकर, वैद्यकीय व्यावसायिक डॉ. लीना बोरूडे आणि जयश्री देवधर यांनी चित्रपटांचे परीक्षण केले आहे.

या महोत्सवात सहभागी होण्यासाठी चित्रपट निर्मात्यांना कोणतेही शुल्क आकारले जात नाही, अशी माहिती चेतन गांधी यांनी दिली. ते म्हणाले,”पी. एम. शहा फाऊंडेशनतर्फे आरोग्यविषयक जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जातात. चित्रपटांच्या माध्यमातून आरोग्यासंबंधीचे प्रश्न नेमकेपणाने लोकांसमोर मांडता येतील, म्हणून २०१० पासून आरोग्य चित्रपट महोत्सव सुरू करण्यात आला. विविध स्तरातील अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत हे लघुचित्रपट पोहोचावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. विशेषतः तरुण वर्ग आणि शाळांकडून या मोहोत्सवास मिळणारा प्रतिसाद लक्षणीय असतो.’’

यापूर्वीच्या आठ आरोग्य चित्रपट महोत्सवांनाही विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. पद्मविभूषण डॉ. के.एच. संचेती, मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. रजनीकांत आरोळे, विल्सन बेजवाडा, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे माजी संचालक विकास खारगे, ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, स्त्रीवादी कार्यकर्त्या विद्या बाळ, सामाजिक कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर, प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी, देविका दफ्तरदार, दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आदींचा त्यात समावेश आहे.