शिवरायांच्या कर्मभूमीतील २३९ विद्यार्थ्यांचे ‘निरंजन’ ने घेतले पालकत्त्व

Share this News:

पुणे 24/9/2019 : स्वराज्य स्थापनेपासून महाराष्ट्र धर्म जागविण्याकरीता लढणा-या शिवछत्रपतींच्या मुलखात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करुन गरजू आणि गरीब मुलांचे शैक्षणिक पालकत्त्व घेण्यासाठी पुणेकर सरसावले. छत्रपती शिवाजी महाराज की जय… च्या घोषणांनी नेहमीच किल्ले रायगडाचा परिसर दुमदुमून जातो. मात्र, चिमुकल्यांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश पडावा आणि भविष्याच्या वाटा उज्ज्वल व्हाव्या, याकरीता झालेल्या अनोख्या कार्यक्रमात शिवरायांच्या घोषणांसोबतच शिक्षणाचा संकल्प करणा-या चिमुकल्यांना पाहून उपस्थितांचे डोळे देखील पाणावले.

पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेने रायगडसह तोरणा, लोहगड, तुंग मधील व मुळशीतील नांदगाव मधील जिल्हा परिषदेच्या शाळांतील २३९ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्त्व स्विकारले. किल्ले रायगड व नांदगाव मध्ये झालेल्या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली तापडिया, दिनेश मुंदडा, ललित पोफळे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राजेश कासट, नवनीत प्रकाशन, नरेंद्र फिरोदिया व राहुल दर्डा या मान्यवरांनी शैक्षणिक पालकत्त्व उपक्रमाला विशेष सहकार्य केले. रायगडमधील ७२, नांदगावमधील १०२ आणि तोरणा, तुंग व लोहगड परिसरातील ६५ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्त्व घेण्यात आले आहे. शाळेचा गणवेश, बूट, दप्तर, पुस्तके, वहया, छत्री आणि वर्षभर पुरेल इतके शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात आले.

अंजली तापडिया म्हणाल्या, यापूर्वी सातत्याने बीडमधील दुष्काळग्रस्त शिरुर कासारमधील विद्यार्थ्यांचे पालकत्त्व घेणा-या संस्थेने यंदा देखील रायगड, नांदगावसह विविध किल्ल्यांच्या पायथ्याशी शिकणा-या विद्यार्थ्यांचे पालकत्त्व घेतले आहे. यामुळे शिवरायांच्या कर्मभूमीत शिक्षणाच्या वाटा खुल्या झाल्या आहेत. केवळ पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहणाºया या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारी सर्व मदत संस्थेमार्फत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हा उपक्रम कायमस्वरुपी राबविणे हे कौतुकास्पद आहे.

ललित पोफळे म्हणाले, सामाजिक बांधिलकी म्हणून मदत देण्यास अनेकजण इच्छुक असतात, परंतु त्यांना योग्य व्यासपीठ आणि दिशा मिळणेही तितकेच गरजेचे आहे. लहान मुलांचे शाळेत जाऊन शिकण्याचे आणि खेळण्याचे वय असूनही केवळ पैशाअभावी शिक्षण घेता येत नसल्याची परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी पुढाकार घेऊन शैक्षणिक पालकत्त्वाकरीता मदतीचा हात द्यायला हवा, असेही त्यांनी सांगितले. यावर्षी बीडमधील शिरुर कासारसह शिवनेरी, अहमदनगर, रायगड, नांदगाव, तुंग, लोहगड, तोरणा यांसह महाराष्ट्राच्या विविध भागांतील व प्रथमच जम्मू-काश्मिरमधील १०६८ मुलांचे शैक्षणिक पालकत्त्व संस्थेने स्विकारले आहे. यामाध्यमातून वर्षभर पुरेल इतके शैक्षणिक साहित्य व इतर मदत मुलांना देण्यात आली आहे.