आंतरशालेय पोवाडा गायन स्पर्धेत नू.म.वि प्रशाला प्रथम

Share this News:

पुणे, 18/8/2019 : कै. शाहीर किसनराव हिंगे जयंतीनिमित्त राष्ट्रीय शाहीरी दिनाचे औचित्य साधून लोकमान्य लोकशाहीरा घ्या शाहिरी मुजरा… आंतरशालेय पोवाडे गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्या वतीने आयोजन स्पर्धेत मोठ्या गटात नू.म.वि प्रशाला व छोट्या गटात यजमान शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीने प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक व्यक्ती, सामाजिक व्यक्ती, राष्ट्रीय व्यक्ती आणि समाजप्रबोधनपर पोवड्यांचे सादरीकरण केले.

स्पर्धेचे आयोजन शनिवार पेठ येथील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. सविता केळकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमात डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संचालक मिलींद कांबळे, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, कार्याध्यक्षा प्रा. संगीता मावळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. शरद खरे, शाहीर बजरंग आंबी यांनी स्पर्धेचे परिक्षण केले. स्पर्धेचे नियोजन स्पर्धा प्रमुख शाहीर होनराजराजे मावळे, राजकुमार गायकवाड, अक्षदा इनामदार, सुरेश तरलगट्टी यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी व शाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त लोकोत्तर लोकपुरूषांना पोवाड्यातून मानवंदना देण्यात आली. स्पर्धेत शाहीरी वेशात सहभाग घेत विद्यार्थ्यांनी विविध सामाजोपयोगी विषयावर पोवड्यांचे सादरीकरण केले. अरुणकुमार बाभुळगावकर यांनी आभार मानले.

निकाल- नू. म. वि प्रशाला (मोठा गट) आणि शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी (छोटा गट) यांचे यश
न्यू इंग्लिश स्कुल रमणबाग (मोठा गट), अभिनव इंग्लिश मिडीयम स्कुल (सीबीएससी) नºहे, (छोटा गट) यांनी द्वितीय तर अभिनव इंग्लिश मिडीयम स्कुल (सीबीएससी) नºहे (मोठा गट), भारतीय विद्या भवन सुलोचना नातू विद्यालय (छोटा गट) यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. दोन्ही गटातील प्रथम क्रमांकास प्रत्येकी ३ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास २ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह व तृतीय क्रमांकास १ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.