पुण्यात आणखी एक महिला कोरोनाबाधित, राज्यातील एकूण रुग्ण संख्या ४२

Coronavirus
Share this News:

मुंबई, दि.18/03/2020: राज्यात आज आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ४२ झाली आहे. त्यातील एका व्यक्तीचा काल मुंबईत मृत्यू झाला आहे. कोरोनाबधित ही ३२ वर्षीय महिला नेदरलँडवरुन दुबई मार्गे पुण्यात आलेली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे:-

पिंपरी चिंचवड मनपा १०,

पुणे मनपा ८,

मुंबई ७,

नागपूर ४,

यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण प्रत्येकी-३,

रायगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद प्रत्येकी-१

एकूण : ४२

राज्यात आज ५८ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकुण १२२७ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ९५८ जणांना भरती करण्यात आले होतं. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ८६५ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत तर ४२ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणा-या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण १२२७ प्रवाशांपैकी ४४२ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्य नियंत्रण कक्ष ०२०/२६१२७३९४ टोल फ्री क्रमांक १०४