सैनिकांना ऑनलाइन मतपत्रिका पाठविल्या जाणार

Share this News:

पुणे, दि. 8/10/2019 :  देशभर कर्तव्य बजावत असणा-या सैनिकासाठी विधानसभा निवडणुकीत ऑनलाइन मतपत्रिकेचा वापर केला जाणार आहे. टपाली मतदान प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि मतपत्रिका वेळेत मिळावी यासाठी इलेक्ट्रोनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम (ईटीपीबीएस)च्या माध्यमातून सैनिकांना ऑनलाइन  मतपत्रिका पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज केंद्रीय निवडणूक निरीक्षक संतोष कुमार यादव,जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम, टपाली मतप्रक्रिया समन्वय अधिकारी सुनील गाढे तसेच संबंधित विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत ईटीपीबीएसद्वारे सैनिकांना ऑनलाइन मतपत्रिका पाठविण्यात आली .

केंद्रीय निवडणूक आयोगाने सैनिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सीडॅकच्या मदतीने इलेक्ट्रोनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम (ईटीपीबीएस) ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे सैनिकांना ऑनलाइन मतपत्रिका पाठवली जाणार आहे. सैनिकांनी या इलेक्ट्रॉनिक मतपत्रिकेचे  प्रिंट काढून मतदान करून ती मतपत्रिका पुन्हा पोष्टाद्वारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवायची आहे. यामुळे पोस्टल मतपत्रिका सैनिकांपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी वाचणार आहे व सैनिकांची मतपत्रिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे वेळेत पोहोचणार आहे. या प्रणालीमुळे 100 टक्के  नोंदणी झालेल्या सैनिक मतदारांपर्यंत मतपत्रिका पोहचणार आहे .

तसेच यापूर्वी सैनिक मतदारांचे मतदान जे 10टक्क्यांपेक्षा  कमी असायचे ते या प्रणालीमुळे वाढले असून गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ते सुमारे 60टक्क्यांपर्यंत वाढले. विधानसभेच्या निवडणुकीत  ते70 टक्क्यांपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानाचा एकूण टक्का वाढण्यास निश्चितपणे मदत होणार आहे.