आज महावितरणकडून राज्यभरातील कार्यालयांत रक्तदान शिबिरांचे आयोजन

मुंबई, दि. 10 ऑक्टोबर 2019 : सामाजिक बांधिलकी जोपासत महावितरणकडून शुक्रवारी (दि. 11) एकाच दिवशी राज्यभरातील विविध कार्यालयांत रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. महावितरणमधील कर्मचारी व त्यांच्या परिवारातील सदस्य या शिबिरात सहभागी होणार आहेत.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी महावितरणच्या राज्यभरातील विविध कार्यालयांमध्ये एकाच दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे. त्याप्रमाणे दि. 11 ऑक्टोबरला रक्तदानाच्या कर्तव्यात सहभागी होण्याची संधी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध झाली आहे. मुंबई येथील सांघिक कार्यालयांतर्गत वांद्रे येथील प्रकाशगड, धारावी व फोर्ट येथील हाॅगकॉग प्रशासकीय इमारत तसेच राज्यभरातील महावितरणचे परिमंडल, मंडल, विभागीय कार्यालय अंतर्गत शाखा कार्यालयांमध्ये एकाच दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंतच्या कालावधीत रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

रक्तदान शिबिरासाठी संबंधीत शहरातील शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालये व रक्तपेढ्यांमार्फत आयोजित करण्यात आला आहे. महावितरणचे कर्मचारी व त्यांच्या परिवारातील सदस्यांना या शिबिरात सहभागी होता येईल यादृष्टीने सोयीच्या ठिकाणी शिबिरांची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. महावितरणमधील सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यांनी शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.