महापालिकेच्या बांधकाम विभागाचा ‘अर्थपूर्ण’ कारभार !; जागेची पाहणी न करता मोकळ्या ‘प्लॉट’वर बांधकामाला परवानगी

Share this News:

पिंपरी, 9 सप्टेंबर 2019 – पिंपरी औद्योगिक कामगार गृहरचना संस्था मर्यादित, महेशनगर येथील गृहनिर्माण सोसायटीच्या खेळाच्या आरक्षित भूखंडावर मनमानी पद्धतीने बांधकाम केले जात आहे. सोसायटीच्या अध्यक्षाने महापालिकेतील अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनीधींना हाताशी धरुन खेळाच्या मैदानावर चुकीच्या पद्धतीने ‘प्लॅन’ पास करुन बांधकामाचा घाट घातला आहे. बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी स्थळ पाहणी न करता ‘अर्थपूर्ण’ व्यवहारातून परवानगी दिल्याचा आरोप सोसायटीतील नागरिकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. हे बांधकाम तातडीने थांबविण्याची मागणीही त्यांनी केली.

याबाबत सोसायटीतील नागरिकांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, संत तुकारामनगर येथे पिंपरी औद्योगिक कामगार गृहरचना संस्था आहे. या संस्थेचे महेशनगरमध्ये 78 बंगले आहेत. या संस्थेचे दोन मोकळे भूखंड होते. एक भूखंड मुलांना खेळण्यासाठी ठेवला आहे. तर, दुस-या भूखंडावर ब-याच वर्षापूर्वी मंदिर आणि सभागृह बांधण्यात आले आहे. मुलांना खेळण्यासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर बांधकाम करण्यासाठी सन 2017-18 मध्ये गृहरचनेच्या सर्वसाधरण सभेची मान्यता घेतली. संस्थेचे कार्यालय, जीमचे बांधकाम करण्यासाठी ही परवानगी घेतली होती. त्यानुसार महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे परवानगीसाठी अर्ज केला. तथापि, नकाशे विकास नियंत्रण नियमवालीनुसार नसल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाने 17 मे 2018 रोजी परवानगी नाकारला होती.

महापालिकेने परवानगी नाकारलेली असतानाही संस्थेच्या अध्यक्षाने स्थानिक लोकप्रतिनीधींच्या हस्ते कामाचे भूमिपूजन केले. कामाला सुरुवात केली. याबाबत सोसायटीतील नागरिकांनी महापालिकेडे चौकशी केली असता या बांधकामाची परवानगी नाकारली असल्याचे पत्र दिले. तरीदेखील संस्थेच्या अध्यक्षाने बेकायदेशीरपणे बांधकाम सुरुच ठेवले. बेकायदेशीपरणे बांधकाम सुरु असताना महापालिकेतील बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी त्याकडे ‘अर्थपूर्ण’पणे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

नागरिकांच्या तक्रारीच्या भडीमारानंतर अध्यक्षाने बांधकाम थांबविले. त्यानंतर संस्थेच्या सर्वसाधारण सभेची कोणतीही मान्यता न घेता जिल्हाधिकारी कार्यालयातून परस्पर ‘ले-आऊट’मध्ये फेरबदल केले. याची पुसटशीही कल्पना नागरिकांना दिली नाही. फेरबदल झालेली कागदपत्रे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे जमा केली. त्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने 28 ऑगस्ट 2019 रोजी जागेची पाहणी न करताच बांधकामाला परवानगी दिली. या जागेवर अर्धवट बांधकाम झालेले असतानाही महापालिकेने परवानगी कशी दिली ? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

त्यामुळे या चुकीच्या आणि अर्थपूर्ण व्यवहारातून झालेल्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी. बेकायदेशीर बांधकाम सुरु असताना त्याकडे दुर्लक्ष करणा-या अतिक्रमण विभागातील अधिका-यांची, जागेची पाहणी न करताच बांधकामाला परवानगी देणा-या अधिका-यांची सखोल चौकशी करावी. महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पहावे. मोकळे पंटागणे गिळंकृत केले जात असताना महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष करु नये. याची दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी संस्थेतील नागरिकांनी केली आहे. अन्यथा या प्रकरणी न्यायालयात दाद मागण्यात येईल. बेमुदत उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

संस्थेचे सभासद दीनानाथ जोशी म्हणाले, “मुलांना खेळण्यासाठी मोठे पटांगण होते. या पटांगणावर संत तुकारामनगर परिसरातील मुले खेळत होती. त्यासाठी महापालिकेने पुढाकार घेऊन खेळाचे साहित्य देणे अपेक्षित होते. परंतु, तसे न करता खेळाच्या मैदानावर चुकीच्या पद्धतीने आणि कोणतीही पाहणी न करता महापालिका प्रशासनाने परवानगी दिली आहे. याची तातडीने दखल घेऊन सखोल चौकशी करावी. दोषी अधिका-यांवर कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा न्यायालयात दाद मागण्यात येईल” असा इशाराही त्यांनी दिला आहे.