शास्त्रीय संगीतातील विविध बंदिशींच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध

Share this News:

पुणे, 27/8/2019 : शास्त्रीय संगीतातील बंदिशी आणि भजनाने रसिकांवर सुरेल संगीताचा स्वरवर्षाव झाला. विविध बंदिशींच्या सादरीकरणातून गायक पं. रघुनंदन पणशीकर  यांनी आपल्या कसदार गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. शास्त्रीय संगीताच्या निर्मळ स्वरांमध्ये एकरुप झालेल्या गानसंध्येची रसिकांनी अनुभूती घेतली.

नारायण पेठेतील प.प. शिरोळेकर स्वामी महाराज द्वारा संस्थापित आणि प.प.एरंडे स्वामी महाराज द्वारा संवर्धित श्रीमत् जगद्गुरु श्री शंकराचार्य मठातर्फे गोकुळ अष्टमी उत्सव व प.प. एरंडे स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त पं.रघुनंदन पणशीकर यांच्या गायनसेवेचे नारायण पेठ मुंजोबा बोळातील श्रीमत् जगद््गुरु श्री शंकराचार्य मठामध्ये आयोजन करण्यात आले होते. यावेळी प.प श्री वामनानंद सरस्वती स्वामी,किशोर जोशी,सुनंदा कुलकर्णी,अभिषेक दुबे,विनया देव,स्वाती दिवेकर,यश रामलिंगे उपस्थित होते.

कार्यक्रमात पुरिया धनाश्री रागातील पायलिया झंकार मोरी… या बंदिशीने रसिकांची मने जिंकली. यानंतर भूप रागातील सहेला रे… या बंदिशीमध्ये रसिक तल्लीन झाले. बाजे रे मुरलिया… पद्मनाभा नारायणा… या भक्तीगीतांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. पं. रघुनंदन पणशीकर यांना भरत कामत (तबला), राहुल गोळे (हार्मोनियम), सौरभ काडगावकर आणि अभिषेक ढिले (तानपुरा) साथसंगत केली.