मोशीतील जागा पुणे महापालिकेस घनव्यवस्थानासाठी देण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध!

Share this News:

27 May 2019, पिंपरी।

मोशी येथील जागा नियोजित सकारी पार्क तसेच १२ व १८ मीटर रस्ता करण्यासाठी प्रस्तावित असताना संबंधित जागेची मागणी घनकचरा व्यवस्थानासाठी पुणे महापालिका प्रशासनाने राज्य शासनाकडे केली आहे. तसा प्रस्ताव महसूल व वन विभागाने तयार केला आहे. मात्र, त्याला मोशी आणि परिसरातील नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे स्थानिक आमदार महेश लांडगे यांनी स्थानिक नागरिकांना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात अडथळा निर्माण होवू नये यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, मोशी येथील गट नं. (जुना ३२५) ३२७ येथील शासकीय गायरान जमिनीवर पिंपरी-चिंचवड महापालिका मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्र.१/२०८ मनोरंजन केंद्र, आरक्षण क्र. १/२०९ अ- प्रशासकीय व बहुउद्देशीय इमारत आरक्षण क्र. १/२०७ सफारी पार्क यासह १२ मीटर व १८ मीटर रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. संबंधित गायरान जमीन पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.

दरम्यान, महसूल व वन विभागाच्या वतीने मोशीतील एकूण ७७.०१ हेक्टर क्षेत्रापैकी २. ५४ हेक्टर आर क्षेत्र भाडेकराराने पुणे महापालिका प्रशासनाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासकीय हालचाली सुरू आहेत. मात्र, संबंधित जागेवर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत. त्यामुळे ही जागा पुणे महापालिकेस घनकचरा व्यवस्थानासाठी देण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थानिक नागरिकांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी आमदार लांडगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.