स्वागत कमानी व रनिंग मंडपांसाठीचे शुल्क माफ होणार : नगरसेवक हेमंत रासने  

Share this News:

पुणे, 27/8/2019 :  गणेशोत्सव हा पुण्यात मोठया प्रमाणात साजरा होतो. उत्सवासाठी केवळ महाराष्ट्रातून नव्हे, तर देशाच्या कानाकोप-यातून किंबहुना परदेशातूनही नागरिक मोठया प्रमाणात येतात. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी गणेशोत्सव मंडळांकडून स्वागत कमानी व रनिंग मंडप उभारण्यात येतात. यासाठी पुणे महानगरपालिका शुल्क आकारत असून ते माफ करावे, असा ठराव पुणे महानगरपालिका स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी दाखल करण्यात आला. ठरावाला सूचक नगरसेवक हेमंत रासने आणि अनुमोदन नगरसेवक दीपक पोटे यांनी दिले.

स्वागत कमानी व रनिंग मंडपासाठीचे शुल्क माफ करावे, यासाठी पुणे मनपा स्थायी समिती सदस्य व नगरसेवक हेमंत रासने यांनी यापूर्वी अनेकदा मागणी केली होती.

मंगळवारी सुरु झालेली स्थायी समितीचे सभा भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांना श्रद्धांजली अर्पण करुन तहकूब करण्यात आली. मात्र, त्यापूर्वी हा ठराव दाखल करण्यात आला. बुधवारी (दि.२८) हा ठराव स्थायी समितीत मान्य होईल, त्यामुळे प्रशासनाने त्वरीत याची अंमलबजावणी करावी, अशी विनंती नगरसेवक हेमंत रासने यांनी केली आहे.

हेमंत रासने म्हणाले, पुणे शहरातील गणेशोत्सव हा नागरिकांचा उत्सव असून नागरिक स्वयंस्फूर्तीने आणि समर्पित भावनेने हा उत्सव साजरा करतात. यामध्ये कोणाचाही स्वार्थ नसतो. उत्सवात गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा फार मोलाचा वाटा असतो. त्यामुळे मंडळांतर्फे उभारण्यात येणा-या कमानी व रनिंग मंडपांकरीता मनपातर्फे आकारण्यात येणारे शुल्क माफ करावे, अशी मागणी मी यापूर्वी केली होती. त्याला यश येत असून स्थायी समितीमध्ये हा ठराव मंजूर झाल्यानंतर सर्वसाधारण सभा मान्यता देईल, या भरवशावर यंदाच्या उत्सवात प्रशासनाने याची अंमलबजावणी करावी, अशी विनंती त्यांनी केली.