विघ्न टाळावे वीज अपघाताचे

Share this News:

27/8/2019: वीज दिसत नाही मात्र, तिचे परिणाम भयावह असतात. जीवघेणे असतात. त्यामुळे विजेपासून सर्वांना सुरक्षित ठेवण्याच्या उपाययोजनांना सर्वाधिक प्राथमिकता देणे आवश्यक आहे. विघ्नहर्ता श्रीगणेशांचा सार्वजनिक उत्सव लवकरच (दि. 2 सप्टेंबरला) सुरु होत आहे. बाप्पांच्या आगमनाचे वेध सर्वांना लागलेले आहेत. मात्र सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महावितरणकडून अधिकृतपणे तात्पुरती वीजजोडणी आवश्यक आहे. पथदिव्यांवरून, घरातून किंवा वीजयंत्रणेमध्ये आकडे टाकून घेतलेला अनधिकृत वीजपुरवठा हा कोणत्याही क्षणी वीज अपघातांना निमंत्रण देणारा ठरू शकतो.

 

सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट प्रतियुनिट 3 रुपये 27 पैसे अधिक 1 रुपया 28 पैसे वहन (व्हिलींग) आकार असे 4 रुपये 55 पैसे वीजदर आहेत. याउलट घरगुती व वाणिज्यिक किंवा इतर वर्गवारीमध्ये वीजवापराच्या स्लॅबनुसार वेगवेगळे वीजदर निश्चित करण्यात आले आहे. मात्र सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांसाठी घेतलेल्या वीजजोडणीद्वारे वीजवापरासाठी केवळ एकच वीजदर आकारण्यात येत आहे. त्यामुळे कितीही वीज वापरल्यास शेवटच्या युनिटपर्यंत केवळ 4 रुपये 55 पैसे दर आकारण्यात येणार आहे. या तुलनेत घरगुती व वाणिज्यिक वर्गवारीचा वीजदर स्लॅबनुसार दुप्पट व तिपटीने अधिक आहेत. धार्मिक उत्सवांसाठी अधिकृतच वीजपुरवठा घ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्व द्यावे यासाठी वीजदर कमी ठेवण्यात आला आहे.

 

सार्वजनिक गणेशोत्सवात हजारोंच्या संख्येत भाविकमंडळी श्रीगणेशांच्या दर्शनाला आणि विविध ठिकाणी देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. अशा गर्दीच्या ठिकाणी तेथील वीजवहन यंत्रणा व्यवस्थित आणि वीजअपघाताचा धोका टाळणारी आवश्यक आहे. गणेशोत्सवातील मंडप, रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी विद्युत संचमांडणी ही परवानाधारक कंत्राटदारांकडून करून घेतली पाहिजे व काम पूर्ण झाल्यानंतर चाचणी अहवाल सुद्धा घेतला पाहिजे. इलेक्ट्रिक मीटर व इतर स्विचगिअर्स लावलेली जागा देखभालीसाठी व अधिकृत व्यक्तींना काम करण्यासाठी मोकळी ठेवावी. तसेच मीटर व स्विचगिअर्सवर पाणी गळणार नाही याचीही दक्षता घेणे आवश्यक आहे. महावितरणकडून मंजूर जोडभारा इतकाच जोडभार संचमांडणीत जोडणे आवश्यक आहे. या जोडभारानुसार योग्य क्षमतेचे वायर्स / केबल्स तसेच एमसीबी, ईएलसीबी याचाही वापर करण्यात यावा. संचमांडणीत दोन स्वतंत्र व कार्यक्षम अर्थिंगची जोडणी केली पाहिजे. जनित्र वापरत असल्यास बॉडी व न्यूट्रलसाठी स्वतंत्र अर्थिंग जोडणे आवश्यक आहे. यासोबतच मीटर, स्विचगिअर्स, विद्युत उपकरणे आदींजवळ धोक्याची सूचना देणारा फलक लावला पाहिजे व अग्निशमन यंत्रणेची व्यवस्था उपलब्ध असे आवश्यक आहे.

 

गणेशोत्सवात विविध कामांसाठी करण्यात येणारी वायरिंग ही योग्य तसेच दोष व धोकाविरहीत असणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी विजेचे वायर्स विस्कळीत स्वरुपात राहणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. सर्वात महत्वाचे म्हणजे वायरिंगसाठी वापरण्यात येणारे वायर्स हे वीजभारासाठी सक्षम असल्याची खात्री करून घेतली पाहिजे. विजेचा भार सहन करू शकत नसणाऱ्या तकलादू वायर्स वापरल्यास शार्टसर्किट किंवा वायर्स जळून आग लागण्याची शक्यता मोठी असते. संचमांडणीत कोणत्याही प्रकारचे वायर्स / केबल्स यांचे जोड नसावेत. जोड देणे आवश्यकच असल्यास योग्य प्रकारे इन्सुलेशन टेप वापरावे. गणेशोत्सवात पावसाळी दिवस असल्याने तसेच मंडपासाठी टिनांचा वापर होत असल्याने वायर्स लूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेल्या पण टेपने जोडलेल्या असल्यास वीजपुरवठा खंडित होण्यासह वीज अपघाताची शक्यता असते.

 

संचमांडणीत असलेले इन्सुलेटेड जोड तसेच इतर यंत्रणा व उपकरणे हे दर्शनरांगेपासून दूर व सहजपणे कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. संचमांडणीत कुठेही वायर्स प्लगमध्ये खोचू नयेत. पंखे, फ्लड लाईट्‌सची जोडणी ही थ्रीपीन टॉपने करावी. हॅलोजन, फ्लड लाईटस्‌ किंवा जोड असलेल्या वायर्सजवळ सिल्क कपडा, मंडप किंवा इतर ज्वालाग्राही पदार्थ ठेऊ नयेत. वीजपुरवठा करणारी वायर लोखंडी ग्रील, अल्यूमिनियम, स्टील आदींच्या संपर्कात येणार नाही याचीही काळजी घ्यावी. श्रीगणेशाला निरोप देण्यासाठी मिरवणूक काढली जाते. मिरवणूक मार्गावरील उच्च व लघुदाब वाहिन्या, फिडर पिलर्स तसेच इतर वीज यंत्रणा ही मिरवणुकीतील वाहने, देखावे आदींपासून सुरक्षित अंतरावर राहतील याची काळजी घेणे आवश्यक आहे.

 

गणेशोत्सवाच्या काळात वीजतारा जळणे, शार्टसर्किट होणे किंवा वीजव्यवस्थेत बिघाड होणे आदींची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी संबंधीत क्षेत्रातील महावितरणचे संबंधीत परिसरातील जनमित्र, शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता किंवा कार्यकारी अभियंता यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवणे आवश्यक आहे. तातडीच्या मदतीसाठी गरज भासल्यास महावितरणच्या 24 तास सुरु असणाऱ्या टोल फ्री क्रमांक 1912, 18001023435 किंवा 18002333435 या क्रमांकावर संपर्क साधावा. जाणते, अजाणतेपणाने केलेल्या चुका या वीज अपघातांसाठी क्षम्य ठरत नाहीत. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना वीज सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजनांना प्राथमिकता देणे अतिशय गरजेचे आहे.