बारामती शहर व लगतच्या गावांतील 148 रोहित्रांचा वीजपुरवठा सुरक्षेसाठी बंद

Share this News:

बारामती, दि. 26 सप्टेंबर 2019 : कऱ्हा नदीला महापूर आल्याने गुरुवारी (दि. 26) पहाटेच्या सुमारास नदीकाठच्या गावांतील तसेच बारामती व सासवड शहराच्या काही भागातील 258 लघुदाब व 85 उच्चदाब असे 343 वीजखांब कोसळले असून 14 रोहित्रे या महापुरात वाहून गेली आहेत.

महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी पुराच्या पाण्यात उतरून दिवसभर अथक परीश्रम घेऊन बारामती व सासवड शहरांसह नदीकाठच्या गावठाणांमधील वीजपुरवठा सायंकाळपर्यंत पूर्ववत केला आहे. सासवड शहर व नदीकाठच्या सर्व गावठाणातील वीजपुरवठा दुपारपर्यंत सुरु करण्यात आला तर बारामती शहर व नदीकाठच्या काही गावांमधील 148 रोहित्रे पुराच्या पाण्यात असल्याने सुरक्षेच्या कारणासाठी ते बंद ठेवण्यात आले आहे. मात्र 148 पैकी बारामती शहरातील 60 व ग्रामीण भागातील 60 असे एकूण 120 वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा सायंकाळी 6 च्या सुमारास पूर्ववत करण्यात आला.

कऱ्हा नदीला महापूर आल्याने सासवड, निरा, सोमेश्वर या उपविभागातील 185 वीजखांब जमीनदोस्त झाले तर 4 वितरण रोहित्रे वाहून गेले. त्यामुळे सासवड शहर, भिवडी, नागरे, पांडेश्वर, गवाणअर्जून, बेलसर, कोडीत, श्रीक्षेत्र नारायणपूर आदी गावांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र दुपारपर्यंत सासवड शहरासह या सर्व गावांच्या गावठाणातील वीजपुरवठा वीजयंत्रणेची दुरुस्ती व पर्यायी व्यवस्थेतून सुरु करण्यात आला आहे. केवळ कृषीपंपाचा वीजपुरवठा सद्यस्थितीत बंद आहे.

बारामती शहर व बारामती ग्रामीण उपविभागामधील वीजवितरण यंत्रणेला मोठा तडाखा बसला आहे. यामध्ये 158 वीजखांब कोसळले असून तब्बल गुनवडी, पाव्हणेवाडी, मेढद परिसरातील 10 वितरण रोहित्रे वाहून गेली आहेत. कऱ्हा नदीच्या पुरामुळे बारामती शहरातील नदीकाठचा 20 टक्के भाग, काराटी, जळगाव, कऱ्हा वागज, बऱ्हाणपूर, सोनवडी, गुनवडी, पाव्हणेवाडी, मेढद आदी गावांतील 148 वितरण रोहित्रे पुराच्या पाण्याखाली गेल्याने सुरक्षेसाठी वीजपुरवठा आज पहाटेपासून बंद ठेवण्यात आला होता. दुपारनंतर कऱ्हा, वागज, मेढद. जळगाव या गावांतील वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरु करण्यात आला. तसेच बारामती पाणीपुरवठा केंद्राचा देखील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. तर सायंकाळी 120 रोहित्रांचा देखील वीजपुरवठा सुरु करण्यात आला. उर्वरित 28 रोहित्राचा वीजपुरवठा पुराचे पाणी ओसरल्यानंतर सुरु करण्यात येत आहे.

कऱ्हा नदीच्या महापुरामुळे विस्कळीत झालेला वीजपुरवठा व यंत्रणेच्या हानीबाबत प्रभारी प्रादेशिक संचालक व बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुनील पावडे यांनी आढावा घेतला व ग्राहकांचा वीजपुरवठा प्राधान्याने सुरु करण्याच्या सूचना दिल्या. अधीक्षक अभियंता श्री. चंद्रशेखर पावडे, कार्यकारी अभियंता श्री. गणेश लटपटे (बारामती), श्री. अरविंद वनमोरे (सासवड), अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. प्रकाश देवकते, उपकार्यकारी अभियंता श्री. धनंजय गावडे, श्री. सतीश सासणे, बाळासाहेब फासगे, सचिन म्हेत्रे यांच्यासह 180 अभियंते व जनमित्र वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी पहाटेपासून कार्यरत आहेत.