भाटघर उपकेंद्राच्या कंट्रोल रुममध्ये पाणी शिरले भोर शहरासह 60 गावांचा वीजपुरवठा बंद

Share this News:

बारामती, दि. 5 आॅगस्ट 2019 : भोर तालुक्यातील भाटघर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असताना महापारेषणच्या 132/22 केव्ही उपकेंद्राच्या कंट्रोल रुममध्ये पाणी शिरल्याने सोमवारी (दि. 5) सकाळी 8 च्या सुमारास उपकेंद्रातून निघणाऱ्या सर्वच 5 वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद करावा लागला. परिणामी भोर शहरासह 60 गावांचा वीजपुरवठा बंद झाला आहे.

 

भाटघर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने रविवार (दि. 4) पासून दुपारी धरणाच्या स्वयंचलित 18 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. मात्र धरणालगतच असलेल्या भाटघर जलविद्युत केंद्रातील 132/22 केव्ही उपकेंद्रामध्ये आज सकाळी 8 च्या सुमारास पाणी शिरले. कंट्रोल रुममध्ये पाणीच पाणी झाल्याने या उपकेंद्रातून निघणाऱ्या सर्वच पाचही वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद करावा लागला. त्यामुळे भोर शहरासह माळवाडी, नऱ्हे, भाटघर, संगमनेर, वडगाव (डाळ), शिरवली, वाठार, नांदगाव, सांगवी, पिलाणेवाडी, माणुसदरा, आंबेघर आदी 60 गावांचा वीजपुरवठा बंद झाला आहे.

 

महापारेषणच्या उपकेंद्राच्या कंट्रोल रुममधील पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. मात्र इतर दुरुस्ती तसेच चाचण्यांनंतर या उपकेंद्रातून वीजपुरवठा सुरू होण्यास किमान दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे महावितरणकडून भोर शहर व 59 गावांना सातारा जिल्ह्यातील शिरवळ आणि पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील वीजवाहिन्यांद्वारे पर्यायी वीजपुरवठा सुरु करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र पूरपरिस्थिती गंभीर होत असल्याने पर्यायी वीजपुरवठ्यामध्ये अडथळे येत आहेत.

 

पुणे प्रभारी प्रादेशिक संचालक व बारामती परिमंडलाचे मुख्य अभियता श्री. सुनील पावडे यांनी याबाबत माहिती घेऊन भोर व लगतच्या गावांना तातडीने पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अधीक्षक अभियंता श्री. चंद्रशेखर पाटील, कार्यकारी अभियंता श्री. अरविंद वनमोरे, भोरचे उपकार्यकारी अभियंता श्री. संतोष चव्हाण आदींसह 60 कर्मचारी पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दरम्यान आमदार श्री. संग्राम थोपटे यांनी भाटघर उपकेंद्राला भेट देऊन पाहणी केली. पूरपरिस्थितीमुळे उदभवलेल्या या परिस्थितीमध्ये महावितरणचे अभियंता व कर्मचारी वीजपुरवठा सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर काम करीत असून वीजपुरवठा बंद असलेल्या कालावधीत नागरिकांना सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.