नैसर्गिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी सुयोग्य नियोजनाची गरज!

Share this News:

‘वनराई’चे संस्थापक स्व. मोहन धारिया यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित पर्यावरण व्याख्यानमालेत मान्यवरांचा सूर

पुणे दि. 13: ‘वनराई’चे संस्थापक स्व. डॉ. मोहन धारिया यांच्या स्मृतीदिनानिमित्त रविवार, दि. 13 ऑक्टोबर 2019 रोजी निसर्ग संवाद व वनराई संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण व्याख्यान सत्राचे आयोजन सह्याद्री सदन सभागृह येथे करण्यात आले. नैसर्गिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी सुयोग्य नियोजन ही काळाची गरज असल्याचा सूर मान्यवरांच्या मार्गदर्शनातून उमटला.

                या कार्यक्रमास ‘वनराई’चे अध्यक्ष श्री. रवींद्र धारिया, प्रमुख मार्गदर्शक नंदु कुलकर्णी, प्रा. श्री. द. महाजन, डॉ. पराग महाजन, श्री. प्रशांत इनामदार, प्रा. विनय र. र., केतकी चौगले आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक श्री. रवींद्र धारिया यांनी केले.

    कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना उद्यान सल्लागार आणि पर्यावरण अभ्यासक नंदू कुलकर्णी यांनी वृक्ष जतन कायद्याची व नियमांची माहिती दिली. हा कायदा व त्यानुसार केलेले नियम सामान्य नागरिकांना कसे अडचणीचे आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले.  त्याचबरोबर वृक्ष प्राधिकरणाची कर्तव्ये काय आहेत, हे सांगून यंत्रणेच्या अकार्यक्षमतेवरही त्यांनी बोट ठेवले. ‘वृक्ष देखभाल’ होत नसल्यामुळे शहरातील अनेक वृक्ष व फांद्या पडून अपघात घडत असतात. हे रोखण्यासाठी महापालिकेत आयुक्त दर्जाचा वृक्ष व पर्यावरण अधिकारी आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

त्यानंतर मार्गदर्शन करतांना प्रा. विनय र.र. यांनी इलेक्ट्रीकवर चालणारी वाहने खरोखरच पर्यावरणपूरक आहेत का, याबाबत माहिती दिली. बॅटरीवर चालणारी वाहने रस्त्यावर धुर सोडणार नाहीत, हे खरे असले तरी त्या वाहनांना चार्ज करण्यासाठी वीज लागणार. वीज कोठून आणणार तर कोळसा जाळून किंवा डिझेल जाळून. कोणतीही वीज वापरली तरी कर्ब वायू बाहेर पडणार असून तो पेट्रोल किंवा डिझेल वापरुन बाहेर पडणार्‍या कर्बवायूपेक्षा अधिक असेल. आपण सर्वांनीच वीजेचा वापर काटकसरीने करायला पाहिजे, हा संदेश त्यांनी दिला.

                दुसर्‍या सत्रात वाहतूक अभ्यासक व सल्लागार श्री. प्रशांत इनामदार यांनी ‘पुणे मेट्रोचे दुष्परिणाम’ या विषयावर मार्गदर्शन केले. आज शहरांमध्ये वाहतूक ही गंभीर समस्या असून त्यावर उत्तम पर्याय म्हणजे सार्वजनिक वाहतूक. मेट्रो हा सर्वात खर्चिक व उच्च क्षमता असलेला उपाय आहे. आधीचे सर्व व्यवहार्य पर्याय अंमलात आणल्यानंतर गरज भासल्यास अखेरचा पर्याय म्हणून मेट्रो उभारली गेली पाहिजे. परंतु आज देशात विपरीत चित्र असून व्यवहार्यता लक्षात न घेता मेट्रोचे ओझे लादले जात आहे, त्याचे कायमस्वरुपी परिणाम घातक होतील, असे श्री. इनामदार यांनी स्पष्ट केले.

निसर्ग अभ्यासक डॉ. पराग महाजन यांनी भारतातील तसेच भारताबाहेरील विविध जंगलांची माहिती दिली.  त्यातील काही जंगलातील अनुभवांविषयीची रंजक माहिती त्यांनी दृक-श्राव्य माध्यमाव्दारे दिली. केतकी चौगले यांनी, पर्यावरणाचा समतोल साधला जाण्याची गरज आपल्या मार्गदर्शनात अधोरेखित केली.

समारोपाच्या भाषणात वनस्पती व पर्यावरणशास्त्र तज्ञ प्रा. श्री.द. महाजन यांनी वृक्ष लागवडीबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, भारतात वृक्षतोड आणि जंगलांचा र्‍हास इतक्या मोठ्या प्रमाणावर झाला आहे की, आता वृक्षलागवड युध्दपातळीवर करण्याची आवश्यकता आहे हे सर्वमान्य आहे. परंतु वृक्षलागवड करतांना काही तांत्रिक बाबी लक्षात घेतल्या गेल्या पाहिजेत. वृक्ष लावताना ते कोणत्या जातीचे, किती प्रमाणात, कसे व केव्हा लावायचे, कसे वाढवायचे याचा काळजीपूर्वक विचार झाल्यास अपेक्षित यश मिळू शकते.

कार्यक्रमात स्वयंसेवकांना प्रा. श्री. द. महाजन यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली. ‘वनराई’ मासिकाचे कार्यकारी संपादक श्री. अमित वाडेकर यांनी आभार प्रदर्शन केले.