2022 पर्यंत सर्वसामान्य नागरिकाला किमान मुलभूत सुविधा देण्यासाठी मिशन मोडवर काम करा चंद्रकांत पाटील

Share this News:

पुणे दि. 14- सन 2022 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत, 2022 पर्यंत सर्वसामान्य नागरिकाला किमान मुलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी मिशन मोडवर काम करावे, असे आवाहन महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले. जिल्हा वार्षिक योजनेचा उपलब्ध निधी वेळेत खर्च करण्याचे निर्देशही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी दिले.

 

जिल्हा वार्षिक योजना 2019-20 बाबत महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत(दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. आर्थिक वर्षातील मंजूर कामांचा आढावा घेतांना पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी खा. गिरीश बापट, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मनपाचे अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्‍हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावी, सामाजिक न्‍याय विभागाचे सहायक आयुक्‍त विजयकुमार गायकवाड, यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 

पालकमंत्री पाटील यांनी 2019-20 या वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या विविध विकास कामांची सद्यस्थिती, कामावर झालेला खर्च आदी बाबींचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी राम यांनी 2019-20 साठी तयार करण्यात आलेल्या आराखडयाबाबत सविस्तर माहिती दिली.

 

पालकमंत्री पाटील म्हणाले, पुणे जिल्हयात पर्यटन वाढीला मोठा वाव आहे, त्यादृष्टिने पर्यटन स्थळांच्या विकासासोबतच पर्यटकांना सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात यावे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून गत तीन वर्षात जिल्हयात झालेल्या कामांचा आढावा घेताना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमुळे ग्रामीण भागात रस्त्यांची चांगली सुविधा उभी राहिल्याचे त्यांनी सांगितले.

 

महावितरणबाबत आढावा घेताना शेतीपंपाबाबत ग्राहकांना मार्चअखेर वीजजोडणी देण्याचे उद्दिष्‍ट पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्‍या. वन विभागच्या विविध योजना, आरोग्य विभाग, क्रीडा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यातील रस्त्यांची स्थिती व त्यासाठी आवश्यक निधी, सामाजिक न्याय विभागांततर्गत अनुसूचित जाती उपयोजना, दलित वस्ती सुधार योजना, नागरी दलित वस्तीमध्ये सुधारणा कार्यक्रम आदी योजनांचाही त्‍यांनी आढावा घेवून योजनांची स्थिती, झालेला खर्च, आवश्यक निधी आदींची माहिती घेतली. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत देण्यात आलेला निधी विहित मुदतीत खर्च करा, अशा सूचना दिल्या. शासनाच्या विकास योजनासंदर्भात लोकप्रतिनिधींशी चर्चा करून लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांची दखल घ्यावी व विकासकामांना गती देण्याची सूचना पालकमंत्री पाटील यांनी केली. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.