पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेचा पुढाकार, जम्मू-काश्मिरमध्ये शिक्षणाची गंगा

पुणे, 18/8/2019 :  कलम ३७० मुक्त भारताचा अविभाज्य भाग असणारे जम्मू आणि काश्मीर आता नवी भरारी घेऊ पहात आहे. प्रगतीशील जम्मू काश्मीर उभारण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनला प्रतिसाद देत पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे तेथील विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून  संस्थेकडून  जम्मू काश्मिर मधील डोडा येथील शाळेतील ५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचे पालकत्व घेण्यात आले. कलम ३७० रद्द झाल्यानंतर जम्मू काश्मीर येथे प्रथमच बाहेरून संस्था येऊन शैक्षणिक मदत करण्यात आल्याची भावना तेथील नागरिकांनी व्यक्त केली. यावेळी तेथील मुलांसमवेत रक्षाबंधन आणि तेथील जवानांसमवेत स्वातंत्र्य दिन देखील मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

जम्मू-काश्मिर मधील डोडा स्टेडियम येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तेथील  जिल्हाधिकारी आयएएस डॉ. सागर डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली शैक्षणिक पालकत्वाचा कार्यक्रम झाला. संस्थेचे संस्थापक जयेश कासट, दुर्गेश चांडक यांसह पोलीस अधीक्षक मुमताज चौधरी, बी. डी. ओ.  फुलाईल सिंग बडरवा, विजय कुमार रैना, शैक्षणिक अधिकारी सोहेल राजा, कार्यक्रमाचे समन्वयक हेमंत जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तसेच ५० शाळांना वॉटर प्युरीफायर देण्यात आले. माता वैष्णोदेवी येथील जनरल जोरावर सिंग ट्रस्ट मार्फत ५०  प्रथम उपचार पेटी देखील देण्यात आल्या.

डॉ. सागर डोईफोडे म्हणाले, पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेचे कार्य मोठे असून, महाराष्ट्रात त्यांनी केलेले काम पाहून त्यांना आम्ही आमच्या भागात येऊन काम करण्याची विनंती केली. त्यांनी विद्यार्थ्यांचे घेतलेले शैक्षणिक पालकत्व आणि इतर मदत विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. यापुढेही त्यांनी विद्यार्थ्यांना अशीच मदत करावी अशी आम्ही संस्थेला विनंती करतो.

विद्यार्थीनी दिया शर्मा म्हणाली, आम्हाला पहिल्यांदाच अशी मदत केली जात आहे. ही मदत आमच्यासाठी महत्त्वाची आहे. ही मदत आम्ही विसरणार नाही आणि चांगले शिक्षण घेऊन मदतीचे सार्थक करु. आम्ही चांगले शिक्षण घेऊन आमच्यासारखे जे गरजू आहेत, त्यांना मदत करु असे आश्वासन यावेळी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनी दिले. शैक्षणिक साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहत होता.

जयेश कासट म्हणाले, महाराष्ट्रातील बीड, शिरुरकासार, राजगड, तोरणा, शिवनेरी, नांदगावसह अनेक  दुष्काळग्रस्त गावातील १०६८ गरजू मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून  शिक्षणासाठी मदतीचा हात देणाºया निरंजन सेवाभावी संस्थेची  शिक्षणाची गंगा आता महाराष्ट्रानंतर जम्मू काश्मीर मध्ये पोहचली आहे. जम्मू काश्मिर हा देखील भारताचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना मदत करणे आपले कर्तव्य आहे. याच भावनेतून तेथील ५० मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेण्यात आले. यापुढे देखील महाराष्ट्रासह जम्मू काश्मिर मधील विद्यार्थ्यांना निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे मदत करण्यात येईल, असे आश्वासन संस्थेतर्फे देण्यात आले.

रईस भाई यांनी आभार मानले. ईश्वर डोईफोडे यांनी कार्यक्रमासाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या.  स्थानिक  नागरिक सोहेल भाई यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.