पुणे :विधानसभेसाठी भाजपची वॉर रूम कार्यान्वित

Share this News:

पुणे, दि. ८ सप्टेंबर, २०१९ : विधानभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांसाठी “वॉर रूम’ कार्यान्वित झाली आहे. शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत भाजपची सोशल मीडिया टिम पोचणार असून आठही विधानसभा मतदारसंघांसाठी ही टीम एकत्रित काम करणार आहे, अशी माहिती भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पुणे शहरातील वॉर रूम प्रदेश आणि केंद्रीय वॉर रूमला संलग्न असेल. पक्षाच्या शहरातील मुख्यालयातून या वॉर रूमचे काम चालणार आहे. शहरावरील टिम तसेच प्रत्येक विधानभा मतदारसंघासाठी एक प्रभारी असेल. त्याच्या मदतीसाठी तेथे दहा जणांची टिम असेल. शहरात सुमारे १०० युवकांची टिम सोशल मीडियावर पक्षाची टिम काम करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांत मतदारांपर्यंत पोचविलेल्या योजनांची माहिती मतदारांना देतानाच तिहेरी तलाक रद्द करणे, कलम ३७० रद्द करणे, चांद्रयान, सार्वजनिक स्वच्छता, मेट्रो आदींबाबत घेतलेल्या प्रमुख निर्णयांचीही माहितीही मतदारांपर्यंत पोचविण्यात येणार आहे, असे मिसाळ यांनी सांगितले.

फेसबुक, व्हॉटसअप, ट्विटर, इन्स्टाग्राम आदींच्या माध्यमातून भाजप मतदारांपर्यंत पोचणार आहे. त्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय व्हॉटसअपचे ग्रूपही कार्यान्वित करण्यात आले आहेत. पर्वती, खडकवासला, कोथरूड, शिवाजीनगर, हडपसर, कॅंटोन्मेंट, वडगाव शेरी, आणि कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या आठही आमदारांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्फत कोणती विकास कामे केली आहेत, याचीही माहिती मतदारांना मिळणार आहे. पीएमआरडीएचा विकास आराखडा, रिंगरोड, विमानतळ विस्तारीकरण, नव्या ई-बस, मेट्रोचे विस्तारीकरण, झोपडपट्टी पुनर्विकास योजनेसाठीच्या नियमावलीतील सुधारणा आदींचा त्यात समावेश आहे. सोशल मीडियावर मतदारांच्या मिळणारा प्रतिसाद, त्यांच्या सूचना भाजपच्या वॉररूमध्ये नोंदविण्यात येणार आहेत.

शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील मतदारांची माहिती पक्षाकडे असून त्यांच्यापर्यंत पक्षाचे कार्यक्रम, उपक्रम पोचविण्यात येणार आहेत. शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत भाजपचा सोशल मीडिया सेल पोचणार आहे, अशीही माहिती मिसाळ यांनी दिली.

माधुरी मिसाळ, (शहराध्यक्ष- भारतीय जनता पाटी, पुणे)- “सोशल मीडियामार्फत भाजप मतदारांपर्यंत पोचत असून त्यासाठीची वॉर रूम आता कार्यान्वित झाली आहे. शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांसाठी भाजपची वॉर रूम कार्यान्वित राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याचे उद्दिष्ट भाजप गाठणार आहे.”