पुणे :  न्यायालयात अस्वच्छता केल्यास ३ महिन्यांपर्यंत शिक्षा किंवा २ हजार रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते

Share this News:

पुणे, ऑगस्ट १६, २०१९ : न्यायालय हे ठिकाण पवित्र मानलं जातं आणि म्हणून न्यायालयाचा परिसर स्वच्छ आणि सुंदर असायला पाहिजे. यासाठी पुण्यातील तरुण वकिलांनी सामाजिक जबाबदारी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती व प्रमुख जिल्हा न्यायाधीश, पुणे यांना गुटखा, तंबाखू, मावा, पान खाऊन न्यायालयातील इमारती आणि परिसर अस्वच्छ कराणारांवर कडक कारवाई करण्यात यावी यासाठीचे निवेदन दिले होते.

या निवेदनाची गंभीर दखल घेत मा. श्रीनिवास अग्रवाल, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, पुणे यांनी एक परिपत्रक काढले असून यापुढे न्यायालय आवारात धुम्रपान करुन, पान, गुटखा, तंबाखू, खावून अस्वच्छता करणाऱ्या व्यक्तिंवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. हे परिपत्रक पुणे जिल्ह्यातील सर्व न्यायालयांसाठी काढण्यात आले आहे.

न्यायालय आवारात अस्वच्छता करणारांवर कारवाई करता यावी यासाठी पोलीस आणि शिपाई यांच्यासोबतच १० तरुण वकिलांची टिम तयार करण्यात आली असून यामध्ये अॅड. विकास शिंदे, अॅड. प्रतिक जगताप, अॅड. उत्तम ढवळे, अॅड. सोमनाथ भिसे, अॅड. किशोर जायभाय, अॅड. अनिल जाधव, अॅड. प्रताप मोरे, अॅड. विजय कुंभार, अॅड. सुजाता कुलकर्णी आणि अॅड. दिप्ती राजपूत यांचा समावेश करण्यात आला आहे.

न्यायालय परिसरात अस्वच्छता केल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित व्यक्तिला ३ महिन्यांपर्यंत शिक्षा किंवा २ हजार रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे न्यायालयात येणाऱ्या पोलीस, वकिल, न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकार यांनी या पुढे आपल्याकडून न्यायालय परिसर अस्वच्छ होणार नाही याची काळजी घ्यावी.