हार्मोनियमच्या श्रवणीय वादनाच्या कलाविष्काराने भारावले रसिक

Share this News:

पुणे, 18/8/2019 : शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भावगीते, भक्तीगीते, लावणी आणि हिंदी चित्रपटगीतांच्या हार्मोनियम वादनाच्या बहारदार वादनाने हार्मोनियम वादक दिप्ती कुलकर्णी यांनी रसिकांची मने जिंकली. हार्मोनियम वादनातून गायक गात असल्याचा आभास निर्माण झाला. तसेच हार्मोनियम वाद्यप्रकारातील मेलोडिका, खर्ज-नर आणि नर-नर हार्मोनियम या वाद्यांच्या वादनाने रसिक थक्क झाले. हार्मोनियमच्या श्रवणीय वादनाच्या कलाविष्काराने रसिक भारावून गेले.

विविध संगीत प्रकारांना हार्मोनियमच्या माध्यमातून साथसंगत करणा-या हार्मोनियम वादक दीप्ती कुलकर्णी यांच्या मास्टर कीज – क्लासिकल मेलडीज आॅफ लिजंडरी सेन्टेनरीयन्स या सोलो हार्मोनियम वादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन  एरंडवणा येथील मनोहर मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. दाबके ट्रस्टच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ हार्मोनियम वादक प्रमोद मराठे, दाबके ट्रस्टचे विश्वस्त अरविंद परांजपे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात पंचतुण्ड नररुण्ड मालधर… या नांदीने झाली. यानंतर पिलू रागातील द्रुततीन तालातील पं. रवीशंकर यांनी रचलेल्या रचनांच्या वादनाला रसिकांनी दाद दिली. कौसल्येचा राम… तू वेडा कुंभार… निजरुप दाखवा… झाला महार पंढरीनाथ… कानडा राजा पंढरीचा… या ग. दि . माडगूळकर यांनी रचलेल्या आणि सुधीर फडके यांनी संगीबद्ध केलेल्या व गायलेल्या निवडक गीतांच्या वादनाने रसिक भक्तीरसात न्हाऊन निघाले. कट्यार काळजात घुसली या नाटकातील घेई छंद मकरंद… या नाट्यपदाच्या वादनाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. ह्रदयी प्रीत जागते… त्या तिथे पलिकडे… रुपास भाळलो मी… स्वप्नात रंगले मी… या सुधीर फडके यांनी अजरामर केलेल्या गीतांच्या वादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
असेल कोठे रुतला काटा… पतंग उडवित होते… या लावणीच्या वादनाला रसिकांनी भरभरून दाद दिली. नौशाद यांनी संगीतबद्ध केलेल्या मोहे पनघट पे… या गीताच्या सादरीकरणाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. ए मेरी जोहराजबी… प्यार हुआ इकरार हुआ है… आजा सनम… चलत मुसाफिर… या मन्ना डे यांनी गायलेल्या  गीतांच्या वादनाला रसिकांनी मनापासून दाद दिली. यानंतर तोंडाने फुंकर मारुन वाजविल्या जाणा-या मेलोडिका या वाद्याद्वारे वाजविलेल्या मजरुह सुलतानपुरी यांच्या रात अकेली है… बाहोमे चले आओ… चुरालिया है… ए मेरे दिल कै चैन… गीतांनी रसिकांना वेगळी अनुभूती मिळाली. शमशाद बेगम यांनी गायलेल्या लेके पहला पहला प्यार… रेशमी सलवार… कजरा मुहोब्बतवाला… या गीतांच्या खर्ज-नर आणि नर-नर या दोन वेगळ्या आवाजाच्या हार्मोनियमच्या वादनाच्या एकत्रित कलाविष्काराने रसिक थक्क झाले. लागा चुनरी मै दाग… मिले सूर मेरा तुम्हारा… या गीतांच्या वादनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

दीप्ती कुलकर्णी यांनी हार्मोनियमवर विविध रचनांचे सादरीकरण केले. त्यांना विक्रम भट (तबला), अजय अत्रे (रिदम मशीन), अनय गाडगीळ (की-बोर्ड) यांनी साथसंगत केली. श्रेयस बडवे यांनी निवेदन केले. निलेश यादव यांनी ध्वनीसंयोजन केले.