‘आरटीओ’कडून जनतेच्या पैशाची उधळपट्टी 

Share this News:
पुणे 25/9/2019 : “प्रादेशिक परिवहन कार्यालयात दर दोन वर्षांनी नियुक्त होणारा अधिकारी येथील कोणत्या ना कोणत्या प्रकारचे नूतनीकरणाचे काम काढतो. स्वतःचे केबिनही सुसज्ज करून घेतो. गरज नसताना अशी नूतनीकरणाचा घाट घालून जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली जात आहे,” असा आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीचे अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केला. शशिकांत कांबळे यांनी सोमवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांची भेट घेऊन याबाबत त्यांना जाब विचारला. यावेळी अभिजीत बोरा, विशाल साळुंके, सागर पानसरे, सुरेश साठे, सागर गायकवाड आदी उपस्थित होते.
शशिकांत कांबळे म्हणाले, “आरटीओमध्ये अनेक समस्या आहेत. त्यामध्ये ऑनलाईन प्रणाली खंडित होणे, कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य असणे, उभ्या असलेल्या गाड्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणे, अशा अनेक समस्या असताना त्याकडे लक्ष देण्याऐवजी आरटीओ अधिकारी अनावश्यक नूतनीकरण करण्यात दंग आहेत. आरटीओ नेहमी वादग्रस्त भूमिका घेत असते. काही दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले होते. आता कोणतीही अडचण नसताना पुन्हा नूतनीकरणाचा घाट अधिकाऱ्यांनी घातला आहे. त्यामुळे जनतेचा पैसा वाया जात आहे. त्यामुळे कार्यालयाने आर्थिक फायदा न पाहता जनतेच्या हिताची कामे करणे गरजेचे आहे.”
दरम्यान, परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी आरटीओ परिसराची एक महिन्यात स्वच्छता करणार असून, प्रणालीत सुधारणा करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. त्यांनी दिलेले आश्वासन दिलेल्या वेळेत पूर्ण न केल्यास समितीचे कार्यकर्ते या कार्यलायत स्वतः स्वच्छतेसाठी उतरणार आहेत. तसेच परिवहन अधिकारी आणि कर्मचारी यांनाही सोबत घेऊन गांधीगिरी मार्गाने येथील कामात सहभागी करून घेणार आहेत, अशा इशारा शशिकांत कांबळे यांनी दिला आहे.
‘आरटीओ’मध्ये सुरु असलेले काम नागरिकांच्या सुविधेसाठीच आहे. तळमजल्यावर एकाच ठिकाणी नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध व्हावेत, यासाठी येथील फर्निचर काढण्यात येत आहे. शासनाने सर्व आरटीओ कार्यालयातील जुन्या वाहनांचा लिलाव करून १ कोटी ५ लाख रुपये मिळवले आहेत आणि राहिलेले काम येत्या दहा दिवसात पूर्ण करण्यात येत आहे,” असे परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी सांगितले.