पुण्यातील समस्त सावरकरप्रेमींने केली कॉंग्रेसभवनसमोर निदर्शने

Share this News:

पुणे, 25/8/2019 : दिल्ली विद्यापीठामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांचा पुतळा बसविला. याला विरोध करीत कॉंग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने (एनएसयुआय) सावरकरांच्या पुतळ्याला काळे फासले. या घटनेचा निषेध करीत पुण्यातील समस्त सावरकरप्रेमींनी रस्त्यावर उतरुन शिवाजीनगर येथील कॉंग्रेसभवनसमोर निदर्शने केली.

समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे, अ‍ॅड.मोहनराव डोंगरे, हिंदू राष्ट्रसेनेचे सचिन पाटील, बजरंग दलाचे नितीन महाजन, रा.स्व.संघाचे दिलीप परब, पतित पावन संघटनेचे कुमार पंजलर, समस्त हिंदू आघाडीचे संतोष गायकवाड, लोकेश कोंढरे, राजू बेंद्रे, प्रितम गीते, गोरक्षक शिवशंकर स्वामी, अनिरुद्ध बनसोड, अरविंद वारुळे यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
सुरुवातीला बालगंधर्व रंगमंदिराबाहेर जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्यासमोर घोषणा देत या घटनेचा निषेध करण्यात आला. त्यानंतर निषेध मार्च काढून कॉंग्रेसभवनसमोर जाऊन निदर्शने करण्यात आली. समस्त हिंदू आघाडी, रा.स्व.संघ, बजरंग दल, पतित पावन संघटना, हिंदू राष्ट्रसेनेचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते.
मिलिंद एकबोटे म्हणाले, सावरकरांसारख्या स्वातंत्र्यसेनानींच्या शरीराचा कण  व आयुष्यातील प्रत्येक क्षण फक्त भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी व्यतीत झालेला आहे. सामाजिक समतेकरीता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लढा दिला. सावरकरांचा पहिला अपमान केला, तो पंडित नेहरुंनी. त्यानंतर राहुल गांधींनी आणि आजच्या काळात मणिशंकर अय्यर व एनएसयुआयने हे पाप केले. कॉंग्रेसने सदैव देशभक्तांची विटंबना केली. कॉंग्रेसने कधीही त्यांना सन्मान दिला नाही. त्यामुळे हिंदू महासागरात कॉंग्रेसला विसर्जीत करायला हवे. तसेच या घटनेला उत्तर म्हणून सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावे.