मुंबई आणि महाराष्ट्राच्या प्रगती व विकासामध्ये शीख समुदायाचे योगदान महत्त्वाचे: राज्यपाल चे. विद्यासागर राव

Share this News:
मुंबई दि. 13 जुलै २०१९ – मुंबई आणि महाराष्ट्राच्या प्रगती व विकासामध्ये शीख समुदायाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.

गुरू नानक विद्याक सोसायटीच्या वतीने गुरु तेगबहादूर नगर येथील गुरू नानक कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात गुरु नानक देव यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन व वारसा या विषयावर आयोजित आंतर -धर्म चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आमदार सरदार तारासिंह, आमदार कॅप्टन आर. तमिल सेल्वन, मौलाना आझाद विद्यापीठाचे कुलगुरू पद्मश्री प्राध्यापक अख्तरुल वासे, मोझांबिक आणि स्वित्झर्लंडचे माजी भारतीय उच्चायुक्त डॉ. जसपाल सिंह, गुरु नानक विद्याक सोसायटीचे अध्यक्ष सरदार मनजीत सिंह भट्टी, व्यवस्थापन समितीचे सदस्य सरदार बचन सिंह धाम, सरदार सर्दुल सिंह, गुरू नानक कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुष्पिंदर भाटिया आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. विद्यासागर राव म्हणाले की, 1947 मध्ये फाळणीनंतरच्या स्थलांतरित कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या गुरु नानक विद्याक संस्थेचे आज वटवृक्षामध्ये रुपांतर झाले आहे.  या संस्थेच्या 38 शैक्षणिक संस्थांमध्ये 25 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

गुरुनानक विद्याक सोसायटीने आपल्या कार्यातून समता, सेवा आणि मानवता ही शीख धर्मतत्त्वे प्रत्यक्ष कृतीत उतरवली आहे. मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये शीख समुदायाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.

पंजाब आणि महाराष्ट्रातील भौगोलिक अंतर मोठे असले तरी अध्यात्म, मानवता आणि सामाईक मुल्यांद्वारे ही दोन राज्य एकमेकांशी जोडली गेली आहेत. तेराव्या शतकात संत नामदेव यांनी भागवत धर्माची पताका पंजाबमध्ये नेली आणि आपले उर्वरित आयुष्य तेथेच व्यतीत केले. त्याचप्रमाणे नंतर दहावे शिख गुरु गोविंद सिंह राज्यात नांदेड येथे आले आणि सत्य धर्माच्या रक्षणासाठी त्यांच्या शिकवण दिली.

शिख धर्म गुरूनानक देव यांनी जगाला दिलेली सर्वोत्तम देणगी-राज्यपाल

गुरु नानक जी भारतातील महान संतांपैकी एक होते. शिख धर्म गुरूनानक देव यांनी जगाला दिलेली सर्वोत्तम देणगी आहे. तर गुरुग्रंथसाहिब ही मानवतेला दिलेली सर्वोत्कृष्ट देणगी आहे. त्यांनी जनतेला अज्ञानाच्या अंध:कारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्याचे काम केले. ते एक अग्रगण्य समाज सुधारक होते. अनिष्ट चालीरिती, अंधश्रद्धा आणि अंधविश्वासाच्या बंधनातून समाजाच्या मुक्ततेसाठी काम केले.

गुरु ग्रंथ साहिब हा एकमेव पवित्र ग्रंथ असावा की ज्यामध्ये बाबा फरीद, कबीर, जयदेव, संत नामदेव, रवीदास आणि इतर अनेक संतांच्या वचनांचा समावेश आहे. विविध धर्मतत्त्वांवरील विश्वासाचे हे एक आदर्श उदाहरण समजता येईल.

विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना राज्यपाल म्हणाले की, शिक्षणाचा उद्देश केवळ पदवी किंवा चांगली नोकरी मिळवण्यापुरता मर्यादित नसावा. नोकरी मिळवणाऱ्याऐवजी नोकरी देणारे बना, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

यावेळी राज्यपाल श्री. राव यांच्या हस्ते राज्याचे माजी पोलीस महासंचालक डॉ. पी. एस. पसरिचा यांना पहिले राय बुलर भट्टी स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.