महिलांनी आत्मनिर्भरतेसाठी कौशल्य प्रशिक्षणाची कास धरावी – ज्योत्स्नाताई एकबोटे

Share this News:

पुणे : दिनांक : २७ डिसेंबर २०१९ : आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतःचे करिअर घडवत असताना प्रत्येकाने क्रमिक शिक्षणासोबतच कौशल्य प्रशिक्षणाचाही अंगीकार करायला हवा, विशेषतः सध्याचे लहान मुलांच्या शिक्षणाचे वाढलेले खर्च, बदलती जीवनशैली लक्षात घेता केवळ घरातील पुरुष सदस्याच्या उत्पनावर अवलंबून न राहता स्वतः आत्मनिर्भर होण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणाची निश्चितच मोलाची मदत होऊ शकते यामुळे व्यक्तिमत्वातील आत्मविश्वास वाढीस लागून आपले मर्यादित जग विस्तारण्यास मदत होते असे मत पुणे महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष ज्योत्स्नाताई एकबोटे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी त्यांनी प्रशिक्षण उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थीनीचे कौतुक करत त्यांच्याशी बोलून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. तसेच ‘यशस्वी’ संस्था व टाटा मोटर्स सीएसआर विभाग यांच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या या कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रमाबद्दलही त्यांनी गौरवोद्गार काढले.

शिवाजीनगर येथील ‘यशस्वी’ संस्थेच्या संतमाई स्किल डेव्हलपमेंट सेंटर येथे ‘यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स व टाटा मोटर्स कंपनीचा सामाजिक उत्तरदायित्व निधी अर्थात सीएसआर अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमातील उत्तीर्ण विद्यार्थिनींना प्रमाणपत्र प्रदान करताना ज्योत्स्नाताई एकबोटे बोलत होत्या.

या उपक्रमाअंतर्गत ‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने असिस्टंट ब्युटी पार्लर, एडव्हान्स फॅशन डिझायनिंग, टॅली, ट्रॅडिशनल फूड, फास्ट फूड, हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस व सिक्युरिटी गार्ड असे सात विषयांचे कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यात आले ज्यामध्ये प्रति कोर्स २५ प्रमाणे एकूण १७५ विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.

यावेळी कार्य्रक्रमाला उपस्थित असलेले टाटा मोटर्स सीएसआर विभागाचे प्रतिनिधी लितेश अत्तरदे व मयुरेश कुलकर्णी यांनी सीएसआर उपक्रमाची सविस्तर माहिती सांगितली.

याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात शीतल घोडके, संपदा ढगे, निवेदिता सव्वाशेर व मंजुषा देशमुख या विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केली.

कार्य्रक्रमाचे प्रास्ताविक ‘यशस्वी’ संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी केले, आभार प्रदर्शन प्रशिक्षिका समृद्धी कोपल्लू यांनी तर सूत्रसंचालन योगेश रांगणेकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी केंद्र प्रमुख प्राची राऊत, मीनाक्षी हिरेमठ, स्वाती घाडगे, स्निग्धा, राजश्री पूजारी, श्रीकांत तिकोने, शाम वायचळ नितीन कोद्रे, अभिजित मालुसरे व विशाल कदम आदींनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.