आजच्या काळात सामाजिक ऐक्याच्या काल्याची गरज : ह.भ.प. बाबामहाराज सातारकर  

Share this News:

पुणे, 18/8/2019 : वारकरी संप्रदायाचे सार म्हणजे काल्याचे कीर्तन. सामाजिक, मन, बुध्दी, हृदय, जीव आणि शिवाचे ऐक्य म्हणजे काला. वारकरी संप्रदाय हा सामाजिक ऐक्यामुळे टिकून आहे. आज समाजात जात, धर्म, सत्तेवरून वाईट राजकारण चालू आहे.  सत्ता आणि संतांचे विचार याचे ऐक्य होईल तेव्हा समाज सुखी होईल. आजच्या काळात संतांच्या विचारांची आणि सामाजिक ऐक्याच्या काल्याची गरज आहे, असे मत प्रवचनकार ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांनी व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे चातुर्मास सोहळ्यानिमित्त सातारकर यांच्या प्रवचनाचे आयोजन स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे. प्रवचनाचा समारोप बाबा महाराज सातारकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला. यावेळी कीर्तनकार ह.भ.प भगवतीताई सातारकर- दांडेकर व ह.भ.प.चिन्मय महाराज सातारकर यांनी त्यांना साथ केली.
ह.भ.प.बाबा महाराज सातारकर म्हणाले, वारकरी संप्रदायात काल्याच्या कीर्तनाची परंपरा कृष्ण अवतारापासून आली. काल्याचे कीर्तन म्हणजे सर्वाना एकत्र घेवून सामाजिक ऐक्याचा काला करायचा आणि त्यांना देखील संत करायचे. संतांचे विचार त्यांच्या मनात रुजवायचे. आपण जे कर्म करतो त्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो ती आपली जात म्हणावी. ज्याला कीर्तनाची आवड आहे ती त्याची जात आहे.
पुढे ते म्हणाले, भगवान कृष्ण यांनी सर्वांना एकत्र केले आणि काला केला. त्यामुळे गोकुळातील सर्वजण होतो. तिथे कोणी उच्च नव्हते, सर्व समान होते. आजच्या काळात या काल्याची अत्यंत गरज आहे. धर्म, सत्ता आणि राजकाराणावरून अनेक वाद होतात. म्हणून आजच्या काळात संतांच्या विचारांच्या काल्याची गरज आहे.