शास्त्रीय संगीत कलाकारांना व्यासपीठ देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या  ‘स्वर सन्निध’संस्थेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याहस्ते उदघाटन 

पुणे :  भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी आणि भारतीय शास्त्रीय संगीत कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कार्यरत ‘ स्वर सन्निध ‘या संस्थेचे पिंपरी -चिंचवड पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले .
गुढी पाडव्याच्या दिवशी ढेपे वाडा येथे झालेल्या शास्त्रीय संगीताच्या मैफलीने या संस्थेचा औपचारिक प्रारंभ झाला .प्रसिद्ध चित्रकार मिलिंद मुळीक ,गायिका अर्चना कान्हेरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .
संस्थेच्या संस्थापक मीनल दातार (शास्त्रीय गायन ),निखिल पटवर्धन(सतार वादन )यांनी ही उदघाटनाची मैफल रंगवली . हार्मोनियमवर सुयोग कुंडलकर ,तबल्यावर निषाद पवार यांनी साथसंगत केली .
निखिल पटवर्धन यांनी सतारीवर  जौनपुरी राग सादर करून रसिकांची मने जिंकली .मीनल दातार यांनी  अल्हैया बिलावल राग सादर करून श्रोत्यांना भारावून सोडले.’दैय्या कहा गये ‘ या बडा ख्यालाबरोबर ‘कवन बतरीया गईलो’ही मध्य लयीतील अप्रतिम बंदिश त्यांनी सादर केली. शेवटी ‘जा रे ,जा रे’ ही द्रूत लयीतील  बंदिश आणि ‘का धरिला परदेस ‘ हे नाट्यपद ,’अवघा रंग एक झाला ‘ हा अभंग दातार यांनी सादर केला .
‘भारतीय शास्त्रीय संगीत सर्वांपर्यंत ,सर्व माध्यमातून पोहोचविणे   हेच ‘स्वर सन्निध ‘संस्थेचे ध्येय्य असून संस्था या ध्येययपूर्तीसाठी कार्यरत राहील ‘,असे प्रतिपादन मीनल दातार यांनी यावेळी बोलताना केले . श्रावण हर्डीकर यांनीही आपल्या छोटेखानी भाषणातून संस्थेला शुभेच्छा दिल्या .