श्रीरामनवमी उत्सवाकरीता तुळशीबाग राममंदिर सज्ज

Share this News:
 
श्री रामजी संस्थान तुळशीबाग ; दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी होणार रामजन्म सोहळा
पुणे :श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम जन्मानिमित्त शनिवार, दिनांक १३ एप्रिल सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांचे श्रीरामजन्माचे कीर्तन होणार असून त्यानंतर सकाळी ११ वाजता श्रीरामांच्या पोषाखाची मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर श्रीरामजन्माचा मुख्य उत्सव दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी साजरा होणार आहे. मंदिरातील सर्व तयारी पूर्ण झाली असून भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थानचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले यांनी केले आहे.
सकाळी कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांच्या कीर्तनानंतर श्रीरामजन्म सोहळा व पाळणा होईल. यावेळी पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे. यावेळी कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले, विश्वस्त रामदास तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, रामचंद्र तुळशीबागवाले, रघुराज तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित राहणार आहेत. रामनवमी उत्सवाचे २५८ वे वर्ष आहे.
श्रीरामाची मूर्ती, गाभारा, सभामंडप व मंदिराचा परिसर फुलांनी व विद्युतरोषणाईने सजविण्यात आला आहे. याशिवाय मंदिराच्या परिसरातील भितींवर श्रीरामाची विविध चित्रे रंगवून घेण्यात आली आहेत. रामजन्म सोहळ्यानंतर श्रीरामाच्या वस्त्राचा म्हणजेच पागोटयाचा प्रसाद देखील भाविकांना देण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री ८ वाजता श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक निघणार आहे. मिरवणुकीचा मार्ग लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर-रामेश्वर चौक-टिळक पुतळा मंडईमार्गे पुन्हा राममंदिर असा आहे.
सोमवार, दिनांक १५ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता लळीत व पायघडीचे कीर्तन आणि समस्त तुळशीबागवाले परिवाराकडून श्रीरामराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. शुक्रवार, दिनांक १९ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी उत्सवाचा समारोप होणार असून ब्रह्मवृंदाकडून श्रीहनुमंतास रुद्राभिषेक झाल्यानंतर श्रीहनुमान जन्माच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होणार आहे.