पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारपासून  दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव

Share this News:
पिंपरी, ता. 12 – पिंपरी-चिंचवड फिल्म क्लबच्या वतीने 16 व 17 मार्चला प्रथमच पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाचे  (शॉर्ट फिल्म  फेस्टिव्हल)  आयोजन करण्यात आले आहे. जगातील वेगवेगळ्या 50 देशांतून आलेल्या 246 लघुचित्रपटांपैकी परीक्षकांनी निवडलेले 41 लघुचित्रपट पाहण्याची संधी चित्रपटप्रेमींना मिळणार आहे, अशी माहिती फेस्टिव्हलचे संयोजक व पिंपरी-चिंचवड फिल्म क्लबचे प्रमुख अविनाश कांबीकर व दत्ता गुंड यांनी दिली.
चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात या फेस्टिव्हलचे उदघाटन दि. 16 मार्चला सकाळी दहा वाजता होणार आहे.  त्यावेळी तुंबाड या बहुचर्चित हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांची विशेष उपस्थितीत तर महापौर राहुल जाधव, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, सांस्कृतिक सल्लागार प्रवीण तुपे, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे आदी मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी महोत्सवाची सुरुवात ‘द रियल हिरोज’ या लघुपटाने होणार असून हा लघुपट पिंपरी-चिंचवडमधील स्वच्छ सफाई कामगारांवर आधारित आहे.
 या महोत्सवात दि. 16 मार्चला सिनेप्रेमींसाठी वर्ल्ड सिनेमा या माध्यमांतून आंतराष्ट्रीय लघुचित्रपट सिनेप्रेमींना बघण्यास मिळणार आहे. तसेच खास रे टिव्हीच्या टिमशी संवाद साधता येणार आहे. या फेस्टिव्हल दरम्यान महिलांसाठी खास वेगळे सेशन घेणार आहे. महिलांच्या विविध विषयाला  गवसणी घालणारे चित्रपट दाखविण्यात  येणार आहे. आणि रोमानिया येथील निवड झालेली दिग्दर्शक रमेश होलबोले यांचा आगासवाडी (विलेज इन द स्काय) हा विशेष माहितीपट दाखविण्यात येणार आहे.
पुण्यातील नामवंत बॅंड एके अजय यांचे थेट प्रेक्षपण (बॅड) पाहता येणार आहे. यावेळी  पिंपरी-चिंचवड फिल्म क्लबच्यावतीने देण्यात येणारा पहिला  युवा प्रेरणा पुरस्कार 2019साठी राष्ठ्रीय पारितोषिक विजेते  दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर अविनाश अरुण यांना देण्यात येणार आहे.  अविनाश अरुण हे पिंपरी-चिंचवडमधील रहिवासी असून या क्षेत्रातील काम करणा-या व्यक्तींसाठी  ते प्रेरणादायी तरुण  व्यक्तिमत्व आहे. पारितोषिक वितरण तुंबाड या बहुचर्चित हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक राही अनिल बर्वे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सुप्रिम मोशन पिक्चरचे संचालक राजेंद्र शिंदे, राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक सुजय डहाके, राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे, आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य असून मोफत प्रवेशिका प्रेश्क्षागृहावर उपलब्ध आहेत. प्रथम येणा-यास प्राधान्य या तत्वावर प्रेक्षकांना प्रेक्षागृहात प्रवेश देण्यात येणार आहे. चित्रपटाशी संबंधित पोस्टर प्रदर्शन देखील भरविण्यात येणार असून त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.