‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाच्या संहितेचे रायगडावर पूजन

Share this News:

11/11/2019- शेतकर्‍यांच्या ज्वलंत प्रश्नावर भाष्य करणार्‍या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाच्या जबरदस्त यशा नंतर लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे हे एक अतिशय भव्य ऐतिहासीक चित्रपट घेऊन येत आहेत ‘सरसेनापती हंबीरराव’. या अतिभव्य ऐतिहासीक चित्रपटाच्या संहितेचे पूजन हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडावर महाराष्ट्रातील पाच शेतकर्‍यांच्या हस्ते करून प्रविण तरडे यांनी पुन्हा एक आदर्श पायंडा पाडला आहे.

या प्रसंगी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या घोषणांनी रायगडचा आसमंत दुमदुमला, भगव्या रंगाच्या फेट्यांनी वातावरण उल्हासीत झाले होते. तत्पूर्वी चित्रपटाच्या टीमने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या अतिभव्य ऐतिहासीक मराठी चित्रपटाची निर्मिती उर्विता प्रॉडक्शन्स यांची आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींचे सरसेनापती होण्याचा बहुमान हंबीरराव मोहिते यांनी मिळवला. रायगडावर रंगलेल्या या मंगलमय सोहळ्याला चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे, संदीप रघुनाथराव मोहिते पाटील, धर्मेंद्र सुभाष बोरा व सौजन्य सुर्यकांत निकम तीन निर्माते तसेच धैर्यशील मोहिते पाटील, डीओपी महेश लिमये, अभिनेता राकेश बापट, सुनील अभ्यंकर, रमेश परदेशी, अमोल धावडे, सुनील पालकर, तेजपाल वाघ, निखिल चव्हाण, अनिरुद्ध दिंडोरकर, शिवव्याख्याते आणि इतिहास संशोधक सौरभ करडे, मार्केटिंग डायरेक्टर विनोद सातव, कार्यकारी निर्माते विशाल चांदणे यांच्यासह विविध गावातील शेतकरी, माजी सैनिक आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या तळबीडचे ग्रामस्थ आणि चित्रपटाचे कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते.

कुठल्याही स्टुडीओचे पाठबळ नसताना, केवळ समाजभान जपणाऱ्या विषयाच्या बळावर प्रविण तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने घवघवीत यश मिळवले. ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटातून प्रविण तरडे आता ऐतिहासिक विषय घेऊन आले आहेत. ‘सरसेनापती हंबीरराव’ या अतिशय भव्यदिव्य मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सरसेनापती हंबीरराव मोहिते तसेच बहिर्जी नाईक, सोयराबाई, औरंगजेब, संताजी धनाजी आणि सर्जाखान या महत्वाच्या भूमिका पडद्यावर कोण साकारणार याबद्दल औत्सुक्य निर्माण झाले आहे, तसेच लवकरच चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात होणार असून २०२० मध्ये ‘सरसेनापती हंबीरराव’ प्रदर्शित होणार आहे.