ड्राइव्हझीने मुंबई व पुणेदरम्यान व्हेक्टर या वन वे कार रेंटल सेवेचे अनावरण केले

Share this News:

पुणेः ड्राइव्हझी या देशातील सर्वांत मोठ्या पीअर टू पीअर कार आणि बाइक शेअरिंग स्टार्टअपने आज व्हेक्टर या वन वे कार रेंटल सेवेच्या अनावरणाची घोषणा केली असून त्यातून ग्राहकांना दोन शहरांमध्ये पॉइंट टू पॉइंट ट्रिप करणे शक्य होईल. वन वे रेंटर सेवेची सुरूवात कर्नाटकमध्ये बंगळुरू व मैसुरूमध्ये आणि महाराष्ट्रात मुंबई व पुणेदरम्यान झाली आहे.

ग्राहक एका शहरातील आपल्या निश्चित व्हेक्टर झोनमधून कार घेऊ शकतात आणि दुसर्‍या शहरात ती सोडू शकतात. ड्राइव्हझीच्या वेबसाइटवर ९० मिनिटे आधी आरक्षण केले जाऊ शकते. व्हेक्टरच्या अनावरणासोबत ही कंपनी आपल्या ५ लाखांपेक्षा अधिक ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर सुलभता देत आहे. आऊटस्टेशन कार सर्व्हिस जी प्रत्येक वन वे ट्रिपला २५०० रूपयांपेक्षा अधिक आकारते, त्या बदल्यात व्हेक्टर जवळपास अर्ध्या किमतीपर्यंत लवचिकता देते. ड्राइव्हझीसोबत पाच तासांच्या आंतर शहर आरक्षणाचा दर इंधनासह १३५० रूपये आहे. बंगळुरू, कर्नाटक येथे मुख्यालय असलेली ड्राइव्हझी ६ शहरांमध्ये काम करत असून त्यांच्याकडे २००० वाहनांचा ताफा आहे. ड्राइव्हझीच्या ताफ्यामध्ये गिअर आणि बिगर गिअरच्या बाइक्सचाही समावेश आहे. रॉयल एनफिल्ड (क्लासिक) आणि डोमिनर यांच्या महागड्या बाइक्स अत्यंत लोकप्रिय आहेत आणि त्या दर आठवड्याला विकल्या जातात.

ड्राइव्हझीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक ऐश्वर्य सिंग म्हणाले की, ड्राइव्हझीच्या नावीन्यपूर्ण पीअर टू पीअर शेअरिंग मॉडेलमुळे ग्राहकांना आपल्या गाड्या व बाइक्स बंद असताना प्लॅटफॉर्मवर ठेवता येतात आणि एरवी घसारा होत असलेल्या मालमत्तेवर पैसे कमावता येतात. भारतातील कार शेअरिंगची बाजारपेठ मोठी असताना आमचा विश्वास आहे की, बाइक रेंटल वर्गातही खूप मोठ्या संधी आहेत. व्हेक्टरमध्ये ड्राइव्हझीची गॅरंटी असलेल्या पार्किंग आणि आरक्षणांचा समावेश असून त्याचबरोबर मुक्त वन वे ट्रिपही मिळते. आम्ही व्हेक्टरची व्याप्ती वाढवून वन वे डॉकलेस बाइक आणि स्कूटर रेंटल्स जूनपर्यंत आणण्याच्या प्रयत्नात आहोत. या वर्षी आमच्या ताफ्यात सुपरबाइक्सही येणार आहेत. आम्हाला विश्वास आहे की, आमच्या भारतभरातील प्लॅटफॉर्मवर 5000 बाइक्स आणि 20,000 गाड्या 2018 च्या शेवटापर्यंत असतील आणि त्यातील 10 टक्के इलेक्ट्रिक वाहने असतील.

ड्राइव्हझीचे उद्दिष्ट मोटरसायकल्स आणि स्कूटर्ससाठी जूनपर्यंत डॉकलेस शेअरिंग सेवांचा समावेश करण्याचे आहे. यामुळे ग्राहकांना अशी एक दुचाकी घेता येईल, जी जवळपास पार्क केलेली असेल आणि त्यांना शहरात ती कुठेही सोडून देता येईल. पारंपरिक रेंटल सेवांच्या तुलनेत डॉकलेस शेअरिंगमुळे वाहन निश्चित पार्किंगच्या स्थळी सोडून देण्याची गरज निघून जाते आणि ग्राहकांना चांगली सोय मिळू शकते. यामुळे ड्राइव्हझीला 24/7 सेवा आणि वन वे ट्रॅव्हल ऑटो व टॅक्सींच्या 50 टक्के किमतीत देणे शक्य होते. ही कंपनी 2018च्या शेवटापर्यंत 12 शहरांमध्ये ही ऑटोमेटेड यंत्रणा नेण्यासाठी सीरिज बी निधी उभारत आहे.

ड्राइव्हझीने आपल्या बाइक शेअरिंग ऑपरेशन्सची सुरूवात बंगळुरूमध्ये जून 2017 मध्ये सुरू केली असून त्यात 250 बाइक्स होत्या. अवघ्या काही महिन्यांच्या कालावधीत 4 शहरांमध्ये त्यांच्याकडे 700 बाइक्स आल्या आहेत. या यशाला चालना देणारा एक मूलभूत घटक म्हणजे अ‍ॅग्रेगेटरपासून मार्केटप्लेस मॉडेलपर्यंत बदल घडवून आणण्याचे कंपनीचे धोरण होय. ड्राइव्हझीचे उद्दिष्ट कर्नाटकमध्ये आपला पाया विस्तारित करण्याचे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर असंघटित असलेल्या बाइक रेंटल बाजारपेठेला रचनात्मक रूप देण्याचे आहे.