Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

बँकेत ठेवी ठेवताना ठेवीचा नव्हे तर कर्जाचा व्याजदर विचारा :विद्याधर अनास्कर

पिंपरी (दि. 28 एप्रिल 2018) कोणत्याही बँकेत ठेव ठेवताना ठेवीचा व्याजदर न विचारता बँकेच्या कर्जाचा व्याजदर विचारावा. कर्जाचा व्याजदर जास्त असेल तर ठेव ठेवू नये कारण कर्जाचा व्याजदर मार्केटच्या तुलनेत कमी असेल तर कर्ज थकीतचे प्रमाण कमी असते. अधिक दराने कर्ज घेणारास त्याची परतफेड परवडत नाही. बँक अडचणीत सापडते. लाभ हा रिजनेबल असणे ठिक पण अधिक लोभ करायला गेल्यास नुकसान होऊ शकते हे ठेवीदारांनी लक्षात घ्यावे असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ञ विद्याधर अनास्कर यांनी येथे केले.

चिंचवड गावातील गांधीपेठ तालीम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित जिजाऊ व्याख्यानमालेत ‘बॅकिंग-सामान्यांच्या दृष्टीकोनातून’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना अनास्कर बोलत होते. अध्यक्षस्थानी अभय पोकर्णा होते. यावेळी नगरसेवक अमित गावडे, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, सचिन गजानन चिंचवडे, समन्वयक सुहास पोफळे आदी उपस्थित होते.

यावेळी अनास्कर म्हणाले की, पूर्वीच्या काळी बँकांचा प्रसार झाला नव्हता तेव्हा लोक गाडग्या – मडक्यात पैसे ठेवत आजही गृहिणी पैसे साठवतात. अन अडिअडचणीला घरातील कर्त्या पुरुषाला ते उपलब्ध करुन देतात मात्र, अर्थव्यवस्थेत या कृतिला शुन्य मार्क्स दिले जातात. आजही पन्नास टक्के लोकांना बॅंकींगची सवय नाही. पैसा घरातच साठवून ठेवणे अयोग्य आहे. हा अनुत्पादक पैसा उत्पादकतेकडे वळला तर हळूहळू समाज व राष्ट्र प्रगतिपथावर जाईल. जनधन योजनेसारख्या माध्यमातून सरकारला हेच सांगायचे आहे. बॅंकेत पैसे ठेवणे म्हणजे बँकींग नव्हे तर आपले छोटे आर्थिक व्यवहारही बॅंकींगच्या माध्यमातून चेकव्दारे होणे अपेक्षित असल्याचे अनास्कर म्हणाले.

बॅंकींग एक कला आर्ट आहे. ग्राहकाचे अज्ञानही बँकेच्या बॅलन्स शीटमधील सर्वात मोठी असेट असते. कर्ज घेताना व्याजदर फ्लोरिंग की फिक्स हे बँका सांगत नाहीत. आता तर शून्य टक्के व्याजदराचे आमिष कार, दुचाकी विक्री करणारे शोरुम दाखवत आहेत. मात्र शून्य टक्के व्याजदर हा प्रकार असूच शकत नाही हे ग्राहकांनी लक्षात घ्यायला हवे असे अनास्कर म्हणाले. बॅंका, पोलिस, पुढारी, पत्रकार, वकील यांना कर्ज देत नाहीत. निगेटीव्ह प्रोफाईल म्हणून या घटकांकडे पाहतात. त्यामुळे आता कर्ज मिळवून देणारे सल्लागार हा घटक निर्माण झाला आहे. कर्ज देताना बँकेचे लोक व्हिजिटला येतात तेव्हा घरातील अमुक फोटो काढा तमुक लावा असा सल्ला दिला जातो. अशी मिस्कील टिपण्णी अनास्कर यांनी केली.

चौकट : एकूण बँक घोटाळ्यांपैकी 95 टक्के घोटाळे राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये झाले. 2 टक्के घोटाळे खासगी बँकांमध्ये तर 3 टक्के सहकारी बँकांमध्ये झाले असल्याचे विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.

यावेळी अनास्कर यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. एका विद्यार्थीनीने ‘बिटकॉईन’ बाबत विचारले असता, बिटकॉईनला रिजर्व्ह बॅंकेने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे सुरक्षितता नाही. शिवाय ज्या ॲकटीविटीला परवानगी नाही त्यातून पैसे कमावणे गुन्हा आहे. या सोप्या शब्दात त्यांनी विद्यार्थीनीचे समाधान केले.

बहिरजी चिंचवडे यांनी सुत्रसंचालन केले तर आभार महेश गावडे यांनी मानले.

जिजाऊ व्याख्यानमालेत यावर्षी दि. 30 एप्रिल रोजी विविध पुरस्कारांचे वितरण होणार आहे. क्रांतिवीर चापेकर पुरस्कार, डॉ. सुशील कुलकर्णी यांना, चिंतामणी पुरस्कार, पत्रकार विजय भोसले जिजाऊ पुरस्कार प्रमिला खाडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. पोलिस उपायुक्त सुनिल खळदकर व गणपत शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असल्याचे गांधीपेठ तालीम, मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांनी सांगितले.