वाहतुक शाखेच्या वतीने जनजागृती अभियान अंतर्गत स्टिकर्स वाटप
पिंपरी (दि. 21 एप्रिल 2018) शहरात वाढलेल्या वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढत आहे. वाहतुक शाखेकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे वाहतुकीचे नियम मोडून सिग्नलकडे दुर्लक्ष करण्याचे वाहन चालकांचे प्रमाण जास्त आहे. वाहतुकीचे सर्व नियम वाहन चालकांनी पाळावेत यासाठी वाहतुक शाखेच्या वतीने शहरात प्रमुख चौकांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
या जगजागृती अभियानाअंतर्गत पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात पोलीस निरीक्षक आर.एस.निंबाळकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक एस्.एच्.भागवत यांनी दुचाकी व चारचाकी वाहनांवर जनजागृती अभियानाचे स्टिकर्स लावले. यावेळी पोलिस नाईक आर.पी.हांडे, एस.आर. साळुंके, पोलिस शिपाई पी.एच.चोरमले उपस्थित होते. वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे, सिग्नलचे पालन करावे. वाहन चालवित असताना मोबाईलचा वापर करु नये. दुचाकी वाहन चालकांनी हेल्मेटचा व चारचाकी वाहन चालकांनी सिटबेल्टचा वापर करावा. चौकात सिग्नलला वाहन उभे करताना झेब्रा क्रॉसिंग पट्ट्यावर थांबू नये. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरीक, अंध, अपंग व्यक्तींना तसेच पादचा-यांना प्रथम रस्ता ओलांडण्यास प्राध्यान्य द्यावे. वाहन चालकाचा परवाना, वाहनाची सर्व कागदपत्रे, वाहन प्रदुषण चाचणी प्रमाणपत्र नेहमी बरोबर ठेवावेत. शाळा, दवाखाना, रुग्णालय अशा ठिकाणी हॉर्न वाजवू नये. तसेच शहरातील ध्वनी व हवा प्रदूषण रोखण्यास सर्वांनी नियमाचे पालन करुन सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी पोलिस निरीक्षक निंबाळकर व सहाय्यक पोलिस निरीक्षक भागवत यांनी यावेळी सर्व आवाहन नागरीकांना केले.
