“शहर शेती” कार्यशाळेचे आयोजन…
पुणे, दि. १ जून : अन्नदाता आणि वनराई आयोजित “शहर शेती” ‘कचरा-सांडपाणी घरच्या घरी जिरवूया, सुरक्षित-विषमुक्त अन्न पिकवूया‘ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. नैसर्गिक शहर शेतीच्या उपासक ज्योतिताई शहा आणि कीटकशास्त्रज्ञ डॉ. राहुल मराठे यांचे मार्गदर्शन व सादरीकरण यावेळी कार्यशाळेत होणार आहे. शनिवार, दिनांक २ जून रोजी दुपारी २:३० वाजता मित्र मंडळ चौक, पर्वती येथील वनराईच्या कार्यालयात इको हॉल येथे हि कार्यशाळा होणार आहे.
शहरांमध्ये आज कचऱ्याच्या प्रश्नाने उग्र रूप धारण केले आहे. सांडपाण्याच्या समस्येनेसुद्धा चिंताजनक परिस्थिती निर्माण केली आहे. प्रदूषित पाणी पशू –पक्षी आणि माणसाच्या आरोग्यासाठी घातक झाले आहे. त्यामुळे कमीत कमी कचरा निर्माण करून अधिकाधिक कचरा घरच्या घरी जिरविण्याची गरज सध्या भासत आहे.शेतमालावर फवारली जाणारी कीटकनाशके आणि अन्नधान्यातील भेसळ यामुळे एकूणच मानवी आरोग्य धोक्यात आलेले आहे. या सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी शहरवासियांनी आपले अन्न आपणच पिकवण्याच्या पर्याय निर्माण केला पाहिजे. इमारतीच्या छतावर, बाल्कनीत आणि सभोवतालच्या परिसरात भाजीपाला-अन्नधान्य आणि वनस्पतीची लागवड केल्यास त्याठिकाणी ओल्या कचऱ्यासह अनेक टाकाऊ वस्तू उपयोगात आणता येऊ शकतात. अशा अनेक गोष्टीचे मार्गदर्शन मान्यवर तज्ज्ञ या कार्याशाळेत करणार आहेत.
