​खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना ‘पोटशूळ’

Share this News:

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना ‘पोटशूळ’

– विकासकामांत खोडा घालण्याचा प्रयत्न

– लोकसभा निवडणुकीत मतदार बदला घेणार?
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने विकासकामांचा धडाका लावला आहे. परिणामी, शिवसेना खासदारांना ‘पोटशूळ’ झाला असून, विकासकामांत खोडा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीत मतदार याचा बदला घेतली, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. 

शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये भाजपाच्या कारभारावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले आहे. यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, गटनेते राहुल कलाटे आदी उपस्थित होते. 

भाजपाने पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट गावांमधील पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यावर भर दिला आहे. त्या अनुशंगाने भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका पदाधिका-यांनी भोसरी मतदार संघातील समाविष्ट गावांच्या सार्वांगीण विकासासाठी सुमारे ४०० कोटी रुपयांची विविध विकासकामे हाती घेतली आहेत. भोसरी हा शिरुर लोकसभा अंतर्गत परिसर आहे. त्यातच आमदार लांडगे शिरुर लोकसभेच्या रिंगणात खासदार आढळराव पाटील यांचे कटृटर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे, महापालिका निवडणुकीत आमदार लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा ‘सुपडा साफ’ केला होता. एकूण ४४ पैकी एकाही जागेवर शिवसेनेला यश मिळवता आले नव्‍हते. 

दरम्यान, शिरुर लोकसभा मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाने आमदार लांडगे यांच्याकडे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे खेड, आळंदी, जुन्नर आदी नगरपरिषदांमध्ये ‘कमळ’ फुलवले आहे. आता भोसरीतील विकासकामे मार्गी लावून आमदार लांडगे यांनी ‘व्‍हीजन-२०२०’ ची वचनपूर्ती करण्याच्या दिशेने घोडदौड सुरू केली आहे. परिणामी, शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 

महापालिका प्रशासन आणि भाजपा पदाधिकारी यांनी अत्यंत आर्थिक शिस्तीने विकासकामे मार्गी लावण्यास सुरूवात केली आहे. महापालिका निवडणुकीनंतर समतोल विकासाचे सूत्र अवलंबून भोसरी विधानसभा मतदार संघातील विकासकामे प्राधान्याने मार्गी लावण्याचे नियोजन करण्यात आले. त्याच वेळी शहरातील अन्य समाविष्ट गावांचाही विकास करण्यास कटीबद्ध असल्याचे भाजपा शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे. मात्र, विकासकामांचा डोंगर उभा केल्यामुळे भाजपाची प्रतिमा जनमाणसांत उंचावू लागली आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

‘प्रधानमंत्री आवास’ प्रकल्पाही खोडा?

पुणे-महामार्गाच्या रुंदीकरणाला खासदार आढळराव पाटील यांनी पूर्वी विरोध केला होता. ‘वेस्ट टू एनर्जी’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्प, चाकण विमानतळ आदी प्रकल्पांना विरोध करुन खासदार आढळराव पाटील यांनी सर्वसामान्य नागरिकांचा विरोध पत्करला आहे. त्यातच महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना खासदार आढळराव पाटील यांनी निवेदन दिले आहे. त्यामध्ये प्रधानमंत्री आवास प्रकल्पामध्ये सल्लागार नेमणूक पद्धती चुकीची असल्याचे सांगून ‘आवास’ प्रकल्पालाही खोडा घालण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांच्या घरांच्या स्वप्नांचा चुराडा करण्याचा प्रयत्न करणा-या आढळराव पाटील यांना  लोकसभा निवडणुकीत किंमत मोजावी लागेल, अशी प्रतिक्रिया राजकीय जाणकारांमध्ये व्यक्त होताना दिसत आहे.