अयान अली बंगश यांना पहिला स्वरगौरव पुरस्कार प्रदान

Share this News:

तालानुभूती फाउंडेशन आणि एमपी ग्रुप यांच्या वतीने स्वरपर्व कार्यक्रमाचे आयोजन

पुणे, दि. १८ मार्च, २०१८ : नवोदित आणि विश्वासू कलाकाराचे कौतुक व्हावे या उद्देशाने यावर्षीपासून तालानुभूती फाउंडेशन आणि एमपी ग्रुप यांच्या वतीने संयुक्तपणे स्वरगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. यावर्षीचा पहिला पुरस्कार प्रसिद्ध सरोदवादक अयान अली बंगश यांना आज एमईएस बालशिक्षणच्या सभागृहात झालेल्या ‘स्वरपर्व’ या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. तालानुभूती फाउंडेशनचे संस्थापक रोहित मुजुमदार, एमपी ग्रुपचे संचालक विनायक घोरपडे, तबलावादक सत्यजित तळवळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

ज्या कलाकाराला स्वरगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल त्यांचीच कला यावेळी होणा-या कार्यक्रमात रसिकांना अनुभवता येईल त्याप्रमाणे अयान यांच्या सरोदवादनाने आज पुणेकरांची नव वर्षाची सकाळी सुमधुर झाली. पद्म विभूषण उस्ताद अमजद अली खान यांचे शिष्य व सुपुत्र अयान हे सेनई बंगश घराण्याच्या नवव्या पिढीतील सरोद वादक आहेत. त्यांच्या दमदार आणि मंत्रमुग्ध करणा-या सरोद वादनाची अनुभूती आज पुणेकरांनी घेतली.

अयान यांनी राग ललितने आपल्या वादनाला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी आलाप, आडा, चौताल आणि झपताल यांचे सादरीकरण केले. त्यानंतर त्यांनी राग आनंद भैरव सादर केला. यामध्ये त्यांनी पंचम सवारी आणि तीन तालातील काही रचना सादर करीत त्यांनी उपस्थितांची वाह वाह मिळविली. धृत तालात सादर केलेल्या बंदिशीने अयान यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला.